वृत्तसंस्था/ केपटाऊन
येथे सुरू असलेल्या दुसऱया कसोटीच्या चौथ्या दिवशी इंग्लंडकडून 438 धावांचे विजयाचे आव्हान मिळाल्यानंतर यजमान दक्षिण आफ्रिकेने दिवसअखेर 56 षटकांत 2 बाद 126 धावा जमविल्या होत्या. सलामीवीर पीटर मलान 63 व तर नाईट वॉचमन केशव महाराज 2 धावांवर खेळत होते. द.आफ्रिकेला अजून 312 धावांची गरज आहे.
या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात 269 धावा जमविल्यानंतर द.आफ्रिकेचा पहिला डाव 223 धावांत आटोपला होता. त्यानंतर इंग्लंडने सिबलीचे नाबाद शतक, कर्णधार रूट व बेन स्टोक्स यांच्या अर्धशतकांच्या बळावर 111 षटकांत 8 बाद 391 धावा जमवित दुसरा डाव घोषित करून यजमांनाना 438 धावांचे आव्हान दिले. इंग्लंडने उपाहारानंतर थोडय़ात वेळा आपला दुसरा डाव घोषित केला. सिबलीने संयमी खेळ करीत पहिले कसोटी शतक नोंदवताना नाबाद 133 धावा जमविल्या. त्याने 311 चेंडूंच्या खेळीत 19 चौकार, 1 षटकार मारला. अष्टपैलू स्टोक्सने जोरदार फटकेबाजी करीत 47 चेंडूत 7 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने 72 धावा झोडपल्या आणि सिबलीसमवेत 92 धावांची भागीदारी केली. सिबलीची याआधी 29 ही सर्वोच्च धावसंख्या होती. पण दीर्घ काळ फलंदाजी करण्याची त्याची क्षमता पाहून इंग्लिश निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली. त्याने संथ खेळ करीत शतक झळकवले तरी ते पूर्ण झाल्यानंतर इंग्लिश समर्थकांनी जल्लोष करीत त्याला प्रोत्साहित केले.
स्टोक्सची जलद खेळी केशव महाराजने संपुष्टात आणली. व्हान डर डुसेनने मिडॉनवर त्याचा झेल टिपला. त्याच्या जलद खेळीमुळे इंग्लंडने सकाळच्या सत्रात 27 षटकांत 157 धावांची बरसात केली. याशिवाय बटलरने 23, करनने 13 धावा जमविल्या. द.आफ्रिकेच्या नॉर्टने 3, रबाडा व महाराज यांनी प्रत्येकी 2, प्रिटोरियसने एक गडी बाद केला. द.आफ्रिकेने यापूर्वी 2006 मध्ये वांडरर्सवर झालेल्या वनडे सामन्यात 438 धावांची यशस्वी पाठलाग करीत ऑस्ट्रेलियावर रोमांचक विजय मिळविला होता. त्या सामन्यात विद्यमान प्रशिक्षक असणाऱया मार्क बाऊचरने विजयी फटका मारला होता. मात्र कसोटीमध्ये सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग करण्याचा विक्रम विंडीजच्या नावावर आहे. 2003 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियावर 418 धावा जमवित विजय मिळविला होता.
यावेळीही त्यांना तितक्याच धावांचे कठीण आव्हान मिळाले असून त्याचा पाठलाग करताना दुसऱया डावात पदार्पणवीर पीटर मलान व एल्गार यांनी चहापानापर्यंत बिनबाद 46 धावा जमविल्या व नंतर 71 धावांची अर्धशतकी सलामी दिली. मात्र एल्गारला डेन्लीने 34 धावांवर बाद करून इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. मलानने पहिले अर्धशतक 144 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. दिवसाच्या उपांत्य षटकातील दुसऱया चेंडूवर अँडरसनने हामझाला बाद करून द.आफ्रिकेला दुसरा धक्का दिला. केशव महाराजने उर्वरित चार चेंडू खेळून काढले. यावेळी मलान 62 धावांवर खेळत होता.
संक्षिप्त धावफलक : इंग्लंड प.डाव 269, द.आफ्रिका प.डाव 223, इंग्लंड दु.डाव 111 षटकांत 8 बाद 311 डाव घोषित : सिबली नाबाद 133 (19 चौकार, 1 षटकार), स्टोक्स 72 (47 चेंडूत 7 चौकार, 3 षटकार), रूट 61 (98 चेंडूत 7 चौकार), क्रॉली 25, बटलर 23, डेन्ली 31 करन 13, अवांतर 22. गोलंदाजी : नॉर्ट 3-61, रबाडा 2-69, महाराज 2-160, प्रिटोरियस 1-56.
द.आफ्रिका दु.डाव 56 षटकाअखेर 2 बाद 126 : मलान खेळत आहे 63, एल्गार 34 (78 चेंडूत 2 चौकार), हामझा 18, महाराज खेळत आहे 2, अवांतर 8. डेन्ली 1-26, अँडरसन 1-18.