भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची घोषणा, उभय संघातील पहिली कसोटी दि. 26 डिसेंबरपासून
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
द. आफ्रिकेविरुद्ध आगामी कसोटी मालिकेसाठी सलामीवीर केएल राहुलची उपकर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी ही घोषणा केली. भारतीय संघ या मालिकेसाठी यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेत पोहोचला असून उभय संघातील पहिली कसोटी दि. 26 डिसेंबर रोजी खेळवली जाणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी केएल राहुलच्या नियुक्तीची माहिती दिली.
यापूर्वी, रोहित शर्माला विराट कोहलीचा उपनेता म्हणून निवडले गेले होते. पण, रोहित धोंडशिरेच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर फेकला गेला आणि यानंतर केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवले गेले.
29 वर्षीय केएल राहुलने आजवर 40 कसोटी सामने खेळले असून त्यात 35.16 च्या सरासरीने 2321 धावा नोंदवल्या आहेत. त्याच्या खात्यावर 6 शतके नोंद आहेत. याशिवाय, प्रदीर्घ कालावधीकरिता तो खेळत राहू शकतो, याचे स्पष्ट संकेत आहेत.
‘अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने केएल राहुलची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी उपकर्णधारपदी नियुक्ती केली असून तो रोहित शर्माची जागा घेईल’, असे शाह यांनी पत्रकातून नमूद केले. केएल राहुल उपकर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दि. 13 डिसेंबर रोजीच दिले होते.
यापूर्वी, रोहित शर्माची अजिंक्य रहाणेऐवजी उपकर्णधारपदी निवड झाली. पण, मुंबईत सराव सत्रादरम्यान रोहितची धोंडशिरेची दुखापत चिघळली आणि यामुळे तो किमान 3 ते 4 आठवडे खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. रोहित शर्मा निवडीसाठी उपलब्ध नसल्याने निवडकर्ते पुन्हा अजिंक्य रहाणेकडे हा पदभार सोपवू शकत नव्हते. रहाणेचे स्वतःचे अंतिम संघातील स्थान निश्चित नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला. रिषभ पंतकडे उपकर्णधारपदाचा भार सोपवणे घाईचे ठरले असते. त्या पार्श्वभूमीवर, केएल राहुलची यासाठी निवड केली गेली.
केएल राहुल सध्या तिन्ही क्रिकेट प्रकारातील स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून नावारुपास आला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारातही केएल राहुलकडे रोहितच्या नेतृत्वाखाली उपकर्णधारपद सोपवले जाऊ शकते, असे संकेत आहेत. आयपीएल प्रँचायझी लखनौच्या कर्णधारपदासाठीही केएल राहुल हाच आघाडीवर असल्याची चर्चा आहे.
पहिल्या कसोटीच्या पार्श्वभूमीवर भारतीय खेळाडूंचा फुटव्हॉलीचा सराव
सेंच्युरियन ः दि. 26 डिसेंबरपासून खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय पथकाने शनिवारी कसून सराव केला. मुंबईत 3 दिवसांचे हार्ड क्वारन्टाईन पूर्ण केल्यानंतर भारतीय संघ शुक्रवारी चार्टर्ड फ्लाईटने दक्षिण आफ्रिकेत दाखल झाला. दक्षिण आफ्रिकेत एका दिवसाचे आयसोलेशन पूर्ण करत त्यांनी लगोलग सरावाला सुरुवात केली. बीसीसीआयने व्हीडिओ ट्वीट करत संघाच्या सराव सत्राची माहिती दिली. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडू फुटव्हॉलीचा आनंद लुटताना दिसून आले.
यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आणि यामुळे हा दौरा होणार का, याबद्दलही अनिश्चितता निर्माण झाली. मात्र, दोन्ही नियामक मंडळांनी पुढाकार घेत केवळ एका आठवडय़ाने कार्यक्रम पुढे ढकलत मालिकेची पुनर्रचना केली आहे.