कोरियाचा पोर्तुगालला धक्का, उरुग्वेची घानावर मात
वृत्तसंस्था/ दोहा
दक्षिण कोरियाने बलाढय़ पोर्तुगालला 2-1 असा पराभवाचा धक्का देत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पराभूत झालेल्या पोर्तुगालने याआधीच बाद फेरी निश्चित केली आहे. गट ह मधील अन्य एका सामन्यात उरुग्वेने घानावर 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळविला असला तरी त्यांचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
द.कोरियाने जादा वेळेत निर्णायक गोल नोंदवला. सन हय़ुंग मिनने 91 व्या मिनिटाला चेंडूवर ताबा घेत आगेकूच केली आणि पोर्तुगालच्या बॉक्सजवळ आल्यानंतर त्याने चेंडू हवांग ही-चॅनकडे पास केला. त्याने पोर्तुगालचा गोलरक्षक दिओगो कोस्टाला हुलकावणी देत जोरदार फटक्यावर चेंडू जाळय़ात मारल्यानंतर कोरियन खेळाडू व समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला. त्याआधी सुरुवातीला रिकार्दो होर्टाने पोर्तुगालचा पहिला गोल नोंदवून आघाडी घेतली. 27 व्या मिनिटाला एक कॉर्नर पोर्तुगालचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोच्या पाठीवर लागला आणि चेंडू किम यंग ग्वॉनच्या पुढय़ात पडला. त्याने त्यावर जोरदार स्वीप मारत चेंडूला जाळय़ात धाडून द.कोरियाला बरोबरी साधून दिली.
या विजयामुळे द.कोरियाने गटात 4 गुणांसह दुसरे स्थान मिळविले. उरुग्वेचेही तितकेच गुण झाले, पण कोरियाने जास्त गोल नोंदवले असल्याने कोरियाला दुसरे व उरुग्वेला तिसरे स्थान मिळाले. 2002 नंतर साखळी फेरीतूनच बाहेर पडण्याची उरुग्वेची ही पहिली वेळ आहे. विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत आशियाचे तीन संघ प्रथमच दाखल झाले आहेत.
उरुग्वे विजयी, तरीही स्पर्धेबाहेर
उरुग्वेने घानावर 2-0 असा विजय मिळविला असला तरी त्यांना एक गोल कमी पडल्याने ते स्पर्धेबाहेर पडले. जॉर्जियन डी ऍरास्केटाने उरुग्वेचे दोन्ही गोल नोंदवले. 12 वर्षांपूर्वी द.आफ्रिकेत झालेल्या स्पर्धेत घानाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात उरुग्वेविरुद्ध जादा वेळेत स्पॉटकिक हुकवली होती. त्याचीच पुनरावृत्ती येथे घडली. 21 व्या मिनिटाला त्यांना आघाडी घेण्याची संधी मिळाली होती. पण आंदे अयेवने मारलेली पेनल्टी सर्जीओ रॅशेने आरामात थोपवित ही संधी वाया घालवली. 26 व्या मिनिटाला लुईस सुआरेझने पुरविलेल्या पासवर ऍरास्केटाने हेडरवर उरुग्वेचा पहिला गोल केला. या स्पर्धेतील उरुग्वेचा हा पहिला गोल होता. त्यानंतर सहा मिनिटांनी सुआरेझनेच पुरविलेल्या पासवर अप्रतिम व्हॉली मारत त्यानेच दुसरा गोलही नोंदवला. आणखी एक गोल करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर उरुग्वेने खूप प्रयत्न केले. पण एकमेकांना ढकलण्यात व धक्के देण्यातच सामना संपला. सामना संपल्यानंतर दक्षिण कोरियाने विजय मिळविल्याचे समजल्यावर उरुग्वेचे सर्वच खेळाडू सुन्न झाले. 66 व्या मिनिटाला 35 वर्षीय सुआरेझच्या जागी एडिन्सन कॅव्हानीला खेळविण्यात आले होते. सामन्यानंतर तो खुर्चीत बसून रडत असताना दिसला. त्याची ही शेवटची विश्वचषक स्पर्धा आहे.