प्रतिनिधी / मडगाव :
मडगाव येथील नवीन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कोविड इस्पितळ शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. शनिवारी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी इस्पितळाला भेट देऊन आरोग्य खात्यातील डॉक्टरांसोबत बैठक घेतली. या बैठकीत राणे यांनी डॉक्टरांच्या समस्याही जाणून घेतल्या. या इस्पितळामध्ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
जिल्हा इस्पितळाची पाहणी केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी गेमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, डॉ. विश्वजित फळदेसाई, डॉ. उदय काकोडकर, डॉ. दीपा व इतर उपस्थित होते. येथे कोविड रुग्णांची देखभाल करण्याकरिता 70 लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. या इस्पितळामध्ये एकूण 150 खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना आत घेण्यात येणार नाही. आरोग्य कर्मचारी या रुग्णांची देखभाल करतील, असे राणे यांनी स्पष्ट केले.
वेळेवर चाचणी करून घेण्याची गरज
लोकांनी आपली वेळेवर चाचणी करून घेण्याची गरज आहे. कारण लोक ताप आल्यानंतरही तपासणी करत नाहीत तसेच ताप घेऊनच इकडे तिकडे फिरत असतात. अशावेळी फैलाव होऊन अनेकांना कोविड होण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी आपली चाचणी न करता घरी बसू नये. यातून आपण कोरोना विषाणू पसरवू शकतो हे लक्षात घ्यावे, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
काही लोक श्वास घेण्यास जास्त त्रास जाणवतात तेव्हा आपली चाचणी करण्यासाठी येतानाही आढळून आलेले आहेत. अशा रुग्णांना वाचविणे खूपच कठीण होत आहे. पण आमचे डॉक्टर्स सर्व प्रकारच्या रुग्णांना वाचविण्याचे प्रयत्न करत असतात. त्यामुळे डॉक्टरांचे कौतुक केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळामध्ये नोडल अधिकारी म्हणून डॉ. सुनंदा आमोणकर व डॉ. राजेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच डॉक्टरांच्या राहण्याचीही सोय करण्यात आलेली आहे. लोकांना कोरोनापासून वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत. लोकांनीही याकामी सहकार्य करावे, असे आवाहन राणे यांनी केले.
घरी विलगीकरणात असलेल्या लोकांना गोळ्या, ऑक्सिमीटर व थर्मामीटर देण्यात येईल. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते लवकरच त्याचे वितरण सुरू होईल. अशा प्रकारचे नियोजन उत्तर प्रदेश व बांगलादेशमध्येही करण्यात आलेले आहे. आता याची अंमलबजावणी गोव्यातही करण्यात येईल, असे डॉ. बांदेकर यांनी सांगितले. घरी विलगीकरण करण्यात आलेले व लक्षणे नसलेले रुग्ण लक्षणे दिसू लागल्यावर सुद्धा इस्पितळामध्ये येत नाहीत. अशांना पाच दिवसांच्या आत वरील साहित्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.