अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘द लेडी किलर’मध्ये भूमी पेडणेकरची एंट्री झाली आहे. याची माहिती ट्रेंड ऍनालिस्ट तरण आदर्शने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. निर्मात्यांनी भूमीची नायिका म्हणून निवड केली आहे. अजय बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. तर भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि शैलेश आर. सिंह याची निर्मिती करत आहेत. अर्जुन सध्या कोरोना संक्रमणामुळे होम आयसोलेशनमध्ये आहे.
मोठय़ा पडद्यावर पहिल्यांदाच अर्जुन आणि भूमीची जोडी दिसून येणार आहे. द लेडी किलर हा एक थ्रिलर चित्रपट आहे. अजय बहल यांनी यापूर्वी ‘सेक्शन 375’ आणि ‘बीए पास’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. द लेडी किलर सोबत तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘ब्लर’चे दिग्दर्शनही अजय बहल करत आहेत.
भूमी पेडणेकरच्या आगामी चित्रपटांच्या यादीत अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ आणि ‘बधाई दो’ यासारख्या मोठय़ा चित्रपटांचा समावेश आहे. रक्षाबंधनचे चित्रिकरण पार पडले असून याचे दिग्दर्शन ‘अतरंगी रे’चे दिग्दर्शक आनंद एल. राय करत आहेत.