ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीमधील रोहिणी परिसरात काल रात्री साडेनऊ वाजता एका महिला उपनिरीक्षकाची गोळी घालून हत्या करण्यात आली.
दरम्यान, ज्याने महिला उपनिरीक्षकावर गोळी झाडली तो देखील दिल्ली पोलिसमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. महिला उपनिरीक्षकाची हत्या केल्यानंतर त्याने स्वतःला गोळी घालून आत्महत्या केली. मृत मुलीचे नाव प्रिती असून प्रिती व गोळी झाडणारा युवक हे दोघे बॅचमेट होते. 2018 मध्ये दोघेही दिल्ली पोलिसात रुजू झाले होते अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान, घटनास्थळी असलेल्या एकाने पोलिसांना 112 वर कॉल करुन याबाबतची माहिती दिली. यानंतर तातडीने फॉरेंसिक टीमलाही तिथे पाचारण करण्यात आले. या घटनेच्या पुढील तपासात दिल्ली पोलिसातील जीएस पीएसआय दीपांशू यांनीच प्रीतीवर गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर काही वेळातच त्यांनी त्याच पिस्टलने स्वतःवर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना समोर आली. कर्नाल येथील एका गाडीत त्यांचा मृतदेह सापडला. सध्या पोलीस या हत्येमागचा तपास घेत आहेत.