नागरी बँक, पतसंस्था गटातून प्रा. अर्जुन अबीटकर १५० मतांनी विजयी
प्रतिनिधी/कोल्हापूर
संपूर्ण महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत चुरशीने मतदान झाले होते. आज सकाळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला रमण मळा येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरुवात झाली. या मतमोजणीत काही गटांत धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. विशेष म्हणजे पतसंस्था गटातून आमदार प्रकाश आवडे यांचा प्रा.अर्जुन अबीटकर यांनी १५० मतांनी पराभव केला. आमदार आवाडेंच्या पराभवाने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला आहे.
या गटात विद्यमान संचालक अनिल पाटील, आमदार प्रकाश आवाडे, प्रा. अर्जुन आबिटकर अशी तिरंगी लढत झाली. १२२१ मतदारांपैकी आमदार प्रकाश आवाडे यांना 461मते मिळाली. प्रा. अर्जुन आबिटकरांना 614 तर अनिल पाटील यांना 106 मते मिळाली. आवाडे यांना सत्तारुढ आघाडीत स्थान दिले होते. तर प्रा. आबिटकर हे विरोधी आघाडीतून लढत होते. आबिटकर जिल्हा परिषद सदस्य असून आमदार प्रकाश आबिटकर यांचे बंधू आहेत. अनिल पाटील यांनी मागील निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी सत्तारुढ आघाडीतून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली होती पण आवाडे यांच्या एंट्रीने अनिल पाटील यांचा पत्ता कट झाला.