ऑनलाईन टीम / ठाणे :
एकीकडे लोकांना कोरोनाची लस मिळत नाही, लसीकरणाबाबत अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. तर दुसरीकडे ठाण्यात मात्र एकाच महिलेला एकाच वेळी तीन डोस देण्याचा भयानक प्रकार समोर आला आहे.
- समिती नेमली असून, चौकशी सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे महापलिकेच्या आनंदनगर लसीकरण केंद्राकर हा अजब प्रकार उघडकीस आला आहे. लस घेण्यासाठी गेलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले आहेत. दरम्यान महिलेची प्रकृती स्थिर असून संबंधित महिलेला पालिका डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. असा निष्काळजीपणा करणाऱ्या आरोग्य केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. याबाबत समिती नेमली असून आम्ही चौकशी करत आहोत, असे उत्तर पालिका प्रशासनाने दिले आहे.
ब्रह्मांड इथे राहणारी एक महिला 25 जून रोजी ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असलेल्या आनंदनगर आरोग्य केंद्रावर गेली. याच वेळी केंद्रावर उपस्थित असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी या महिलेला तब्बल एक नव्हे तर तीन वेळा लस दिल्याचा प्रकार घडला होता. एकाच वेळी तीन डोस दिल्याने ही महिला घाबरली आणि घरी आली. आपल्यासोबत झालेला संपूर्ण प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला.
- दोषी आढळल्यास कडक कारवाई करावी
दरम्यान, या प्रकरणी भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पत्रव्यवहार करत, संबंधित महिलेच्या उपचाराची जबाबदारी महापालिकेने घ्यावी असे म्हटले आहे. तसेच तात्काळ त्या महिलेची आरोग्य तपासणी करून उपचाराचा खर्च करावा, त्याचबरोबर भविष्यातील आजारावर उपचार करण्याबाबत जबाबदारी स्वीकारावी. तसेच संबंधित प्रकरणात दोषी असलेल्या आरोग्य कर्मचार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
- तीन वेळेस डोस दिलेला नाही
‘त्या महिलेला तीन वेळा डोस दिलेला नाही. तीन वेळा सुई टोचली गेल्याने तिला रिअॅक्शन झाली आहे. तिच्या कुटुंबियांशी महापालिकेचे डॉक्टर संपर्कात आहेत. आता साळी यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या तब्येतीकडे डॉक्टर लक्ष ठेवून असल्याने चिंतेचे कारण नाही, असे ठामपा उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले आहे .