ऑनलाईन टीम / नाशिक :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्येही घडला असल्याची माहिती समोर येत आहे. चक्क घरात घुसून दोन बहिणींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
- दोन महिला गंभीर भाजल्या
मिळालेल्या माहितीनुसार, पंचवटीतील शिंदे नगर येथील भाविक बिलाजियो सोसायटीमध्ये राहणाऱया एका कुटुंबाच्या घरात घुसून एका रिक्षाचालकाने आग लावून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये भारती गौड आणि सुशिला गौड या दोन बहिणी गंभीर जखमी झाल्या आहेत. मंगळवारी (ता.10) दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. भारती गौड आणि सुशिला गौड आपल्या कुटुंबासोबत असताना आरोपी सुखदेव कुमावत हा तिथे पोहोचला आणि त्याचे कुटुंबातील महिलेसोबत वाद झाले. यानंतर आरोपीने सोबत आणलेल्या पेट्रोलने दोन्ही महिलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यात दोन महिला गंभीर भाजल्या आहेत. आगीत घरातील बरेचसे साहित्य जळून खाक झाले. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
- आरोपी सुखदेव कुमावत याला पंचवटी पोलिसांनी केली अटक
सुदैवाने या घटनेत वयोवृद्ध व्यक्ती आणि तीन वर्षांचा चिराग पार्थच्या प्रसंगावधानाने वाचला. इमारतीच्या सदनिकेला लागलेली आग पाहून, अन्य नागरिकांनी अग्निशमन दलास माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक अशोक भगत, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनेचे नेमके कारण काय, याचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी सुखदेव कुमावत याला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर जीवे मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.