ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगभरात लॉग डाऊन सुरू आहे. लॉक डाऊन असताना रस्त्यावर फिरत असणाऱ्या एका टोळक्याने तलवारीने पोलिसाचा हात कापून टाकल्याची धक्कादायक घटना पंजाब मध्ये घडली. यामध्ये आणखी काही पोलिस जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांवर हल्ला करणारे लोक निहांगा समाजातील आहेत. हे सर्वजण लॉक डाऊन च्या काळातही भाजी मार्केटमध्ये गाड्या घेऊन फिरत होते. यावेळी पोलिसांनी यांच्याकडे कर्फ्यु पास बद्दल विचारले. मात्र, यासर्वांकडे कोणताही पास नसल्याने त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. तर पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेटवर देखील गाडी घातली. त्यानंतर या लोकांनी खाली उतरत पोलिसांवर हल्ला केला. यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजित सिंग यांचा हात तलवारीने कापून टाकला. या हल्ल्यात अन्य दोन पोलिस देखील जखमी झाले आहेत.
यानंतर हे टोळके जवळील गुरुद्वारात लपून बसले आहे. पोलिसांनी गुरुद्वराला घेरले असून सर्वांना शरण येण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता म्हणाले की, आज सकाळी निहंगा समाजातील लोकांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. यामध्ये आमच्या एका उपनिरिक्षकाचा हात कापण्यात आला आहे. तर दोन पोलीस जखमी झाले आहेत. लवकरच या टोळक्याला पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.