ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावर एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेत थेट कार्यालयात धाव घेतल्याची घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश विठ्ठल पिंगळे (वय 34) असे या तरूणाचे नाव असून तो खडकीचा रहीवासी आहे. आज दुपारी 12.30 च्या सुमारास आयुक्त कार्यालयाच्या बाहेर सुरेश पिंगळे हा तरूण काही कामासाठी आला होता. त्यावेळी या व्यक्तीने अचानक रॉकेल अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले आणि पेटत्या अंगाने थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा प्रकार घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्या लक्षात येताच, लोकांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आग विझवली.
या तरुणाने पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज केला होता. मात्र त्याच्यावर तीन ते चार गुन्हे दाखल असल्याने, पासपोर्ट रिजेक्ट करण्यात आला होता, त्यातून त्याने पेटवून घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.