साखरतर येथील महिलेच्या कुटुंबातील बालक पॉझीटीव्ह
प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरानजीकच्या साखरतर येथील केवळ 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधित महिलेच्या घरातीलच हे बाळ असून यामुळे रत्नागिरीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नव्या रूग्णामुळे जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 6 वर पोहोचली आहे. दरम्यान या बालकावर बालरोगतज्ञांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाने सांगितले.
रविवारी रात्री 42 जणांचे अहवाल मिरज येथून प्राप्त झाले. यामध्ये एका 6 महिन्याच्या बाळाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. हे बाळ साखरतर येथील असून त्याची आजी यापुर्वीच पॉझिटिव्ह आढळली आहे. या कुटुंबातील तीन जण आत्तापर्यत आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत.
साखरतर येथील या कुटुंबात एकूण 13 जण राहतात. कुटुंबातील महिला 8 दिवसांपुर्वी कोरोना पॉझीटीव्ह आढळल्यानंतर सर्व सदस्यांना आयसोलेशमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी संबधीत महिलेच्या जावेलाही कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता याच कुटुंबातील 6 महिन्याच्या बालकालाही कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साखरतरवर आता आरोग्य विभाग व प्रशासनाने अधिकच लक्ष केंद्रीत केले आहे..
संबंधित 6 महिन्याच्या बाळावर सिव्हिलमध्ये उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घाबरुन जाण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सांगितले. आतापर्यंत प्रलंबित 103 पैकी 78 जणांचे रिपोर्ट गेल्या 2 दिवसात प्राप्त झाले आहेत. आता केवळ 25 रिपोर्ट येणे बाकी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी सांगितले.
कालुस्तेतील 15 जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह
महसूल प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने कालुस्ते येथील एका मदरसामध्ये जमातीच्या 15जणांचे संस्थात्मक विलगीकरण केले होते. त्यांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरज प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनासह आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
जिल्हय़ात 265 संस्थात्मक क्वारंटाईन
जिल्हय़ातील होम क्वारंटाईनची संख्या 1095 असून संस्थात्मक क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या 265 असल्याचे जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. जिल्हा शासकीय रूग्णालयातील 4 जणांचे अहवाल मंगळवारी प्राप्त झाले असून ते सर्व निगेटीव्ह आले आहेत. रूग्णालयात 2 नव्या संशयितांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कामथे उपजिल्हा रूग्णालयात सोमवारी मृत्यू झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचा अहवालही निगेटीव्ह आला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.