युरो चषक फुटबॉल स्पर्धा ः झेक प्रजासत्ताकविरुद्ध 1-0 फरकाने विजय, रहीम स्टर्लिंगचा 12 व्या मिनिटाला एकमेव गोल
लंडन / वृत्तसंस्था
रहीम स्टर्लिंगने हेडरवर केलेल्या गोलमुळे इंग्लंडने झेक प्रजासत्ताकचा 1-0 अशा फरकाने पराभव केला आणि युरो चषक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या बाद फेरीतील आपले स्थान अगदी थाटात निश्चित केले. ड गटातील या लढतीत रहीम स्टर्लिंगने 12 व्या मिनिटाला गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला व हाच सामन्यातील एकमेव गोल ठरला. या स्पर्धेत त्याचा हा एकूण दुसरा गोल ठरला.
स्टर्लिंगच्या गोलमुळे इंग्लंडने प्रारंभी घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. जॅक ग्रिलिश व टिनेजर खेळाडू बुकायो साका यांनी उत्तम समन्वय साधत जोरदार आक्रमणे चढवली. मात्र, दुसऱया सत्रात संघाच्या आक्रमणाची धार बरीच कमी पडली.
इंग्लंड संघासाठी आता वेम्बलेवरच मंगळवारी बाद फेरीतील सामना रंगेल. ई गटातील फ्रान्स, जर्मनी किंवा पोर्तुगाल यांच्यापैकी एक संघ त्यांचा प्रतिस्पर्धी असू शकतो. इंग्लंड-झेक आमनेसामने भिडण्यापूर्वी या दोन्ही संघांचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित होता. मात्र, फक्त गटातील क्रमवारीसाठीच ही लढत महत्त्वाची होती. त्या अनुषंगाने दोन्ही संघांनी या लढतीवर लक्ष केंद्रित केले होते.
इंग्लंडने पहिल्या सत्रात लवकर गोल नोंदवण्याची ही सलग तिसरी वेळ ठरली. येथे स्टर्लिंगने प्रतिस्पर्धी गोलरक्षक टॉमस व्हॅस्लिकला चकवत हेडरवर गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. ग्रिलिशचा अप्रतिम पास यावेळी विशेष महत्त्वाचा ठरला. या स्पर्धेतील पहिलाच सामना खेळत असलेल्या 19 वर्षीय ग्रिलिशने आक्रमक खेळावर भर देत आपल्या आगमनाची जोरदार वर्दी दिली.
हॅरी केनला देखील या लढतीत बऱयापैकी सूर सापडला. मात्र, बॉल पझेशनच्या निकषावर वर्चस्व गाजवण्यापेक्षा तो आणखी फारसे काही साध्य करु शकला नाही. बदली खेळाडू जॉर्डन हेन्डरसनने इंग्लंडतर्फे गोल नेंदवला होता. मात्र, तो ऑफसाईड दिला गेल्याने हा गोल फेटाळण्यात आला. क्रोएशियाने स्कॉटलंडचे आव्हान संपुष्टात आल्याचे साईटस्क्रीनवर झळकले, त्यावेळी देखील चाहत्यांनी आणखी आनंद साजरा केला.
मॉड्रिकच्या गोलमुळे क्रोएशियाचीही बाद फेरीत धडक
ग्लास्गो ः ल्युका मॉड्रिकच्या कर्लिंग गोलमुळे क्रोएशियाने स्कॉटलंडचा 3-1 असा धुव्वा उडवत या स्पर्धेच्या अंतिम 16 संघातील स्थान निश्चित केले. वास्तविक, क्रोएशियाने यंदा अतिशय ‘स्लो स्टार्ट’ नोंदवला आणि यामुळे ते टीकेचे लक्ष्यही ठरत होते. मात्र, या लढतीत त्यांनी मरगळ झटकत आक्रमक खेळावर भर दिला आणि एकतर्फी विजयासह बाद फेरीत आगेकूचही केली.
क्रोएशियातर्फे निकोला व्लॅसिक व इव्हान पेरिसिकने जोरदार खेळ साकारला. निकोलाने 17 व्या, मॉड्रिकने 62 तर पेरिसिकने 77 व्या मिनिटाला गोल केले. स्कॉटलंडचा या सामन्यातील व स्पर्धेतील एकमेव गोल कॅलम मॅकग्रेगरने 42 व्या मिनिटाला केला.
या विजयासह ड गटात क्रोएशियाने दुसरे स्थान संपादन करत बाद फेरीत आपली जागा निश्चित केली. साखळी फेरीअखेर क्रोएशिया व झेक प्रजासत्ताक गुणांच्या निकषावर संयुक्त स्थानी राहिले. मात्र, क्रोएशियाने गोल डिफरन्सच्या बळावर आगेकूच केली. झेकचा संघ इंग्लंडविरुद्ध 0-1 फरकाने पराभूत झाला होता, याचा त्यांना फटका बसला.
आता क्रोएशियाची बाद फेरीतील लढत ई गटातील रनरअपविरुद्ध होईल. स्वीडन, स्लोव्हाकिया, स्पेन व पोलंड यांच्यापैकी कोणीही त्यांचा प्रतिस्पर्धी असू शकेल. ही लढत दि. 28 रोजी कोपनहेगन येथे होणार आहे. या स्पर्धेत स्कॉटलंडतर्फे केवळ एकच गोल झाला आणि तो ही या शेवटच्या सामन्यात कॅलम मॅकग्रेगरने नोंदवला. या नामुष्कीमुळे त्यांना केवळ एका गुणासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले.
अलीकडील कालावधीत मॉड्रिकच्या फॉर्मवर बरीच प्रश्नचिन्हे उपस्थित केली गेली आहेत. मात्र, येथे या 35 वर्षीय दिग्गज खेळाडूने नजाकतदार खेळ साकारत विजयात मोलाचा वाटा उचलला. बिली गिल्मूरसारखा अव्वल खेळाडू कोरोनाबाधित असल्याने या लढतीत खेळू शकला नाही आणि याचा स्कॉटलंडला मोठा फटका बसला. गिल्मूरच्या गैरहजेरीत स्कॉटलंडचा संघ मिडफिल्डमध्ये बराच दुबळा भासत राहिला आणि क्रोएशियाने याचा पुरेपूर लाभ घेण्यात अजिबात कसर सोडली नाही.