पणजी / प्रतिनिधी
गोमंतकीय रंगभूमीचे सेवक आणि सुपुत्र प्रसिद्ध प्रकाशयोजनाकार कै.धनंजय फाळकर यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण गोमंतकीय रंगभूमीला धक्का बसला आहे. धनंजय फाळकर यांनी अनेक वर्षे रंगभूमीची सेवा केली. त्यांनी असंख्य अशा नाटकांना, एकांकिकांना आपल्या प्रकाश योजना केली होती.धनंजयने प्रकाश योजना केली नाही अशी संस्था व कलाकार गोव्यात विरळच असेल . प्रकाशयोजने बरोबरच त्यांनी दिग्दर्शन व भूमिका पण केल्या होत्या. ते कला आणि संस्कृती संचालनालयात थिएटर आर्ट शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याप्रमाणे कला अकादमीच्या स्कूल ऑफ ड्रामा चे माजी विद्यार्थी होते. त्यांच्या स्मरणार्थ रुदेश्वर पणजी संस्थेने शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता कला व संस्कृती भवन, पाटो – पणजी येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे. समस्त गोमंतकीय कलाकार व स्नेही मंडळींनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.