निधीचा दुरुपयोग टाळण्यासाठी मनपाचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील गरजूंना विविध योजना राबविण्यासाठी राखीव अनुदानांतर्गत निधी मंजूर केला जातो. उच्चशिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना लॅपटॉप घेण्यासाठी अनुदान देण्यात येत होते. मात्र, अनुदानाचा दुरुपयोग होत असल्याचे निदर्शनास आल्याने आता महापालिकाच लॅपटॉप खरेदी करून विद्यार्थ्यांना वितरित करणार आहे. लॅपटॉप खरेदीसाठी नुकताच कोटेशन मागविले आहेत.
महापालिकेला मंजूर होणाऱया अनुदानामधून तसेच महापालिकेच्या माध्यमातून गरजूंसाठी विविध योजना राबविण्यासाठी निधी राखीव ठेवला जातो. मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करण्यात येते. राखीव ठेवण्यात आलेल्या अनुदानामधून स्वयंरोजगार, आरोग्य चिकित्सा, नळजोडणी, डेनेज जोडणी, गॅस जोडणी, तसेच उच्च शिक्षणाकरिता लॅपटॉप, उच्च शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि दिव्यांगांना वेतन व तीन चाकी मोटारसायकल देण्यात येते. या योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यावर निधी जमा केला जातो. तीनचाकी मोटारसायकल महापालिकेकडून वितरित करण्यात येते. उच्चशिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना महापालिकेच्यावतीने प्रशिक्षणवर्ग सुरू करण्यात येतात. पण अन्य योजनेंतर्गत लाभार्थींच्या खात्यावर निधी जमा करण्यात येतो.
लॅपटॉप खरेदी करण्याकरिता 50 हजार रुपयांचे अनुदान महापालिकेकडून देण्यात येते. उच्चशिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांचे अर्ज घेऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार लाभार्थींची निवड केली जाते. त्यानंतर महापालिका सभागृह किंवा प्रशासकाकडून मंजुरी घेऊन लॅपटॉप खरेदी करण्यासाठी लाभार्थींच्या नावे धनादेश दिला जात होता. पण हा धनादेश वठवून निधीचा अन्य कारणांसाठी उपयोग करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे थेट धनादेश देण्यास तत्कालिन मनपा प्रशासक अमलान बिस्वास यांनी आक्षेप घेतला. धनादेश देण्याऐवजी लॅपटॉप खरेदी करून द्यावा, अशी सूचना महापालिका प्रशासनाला केली होती. तसा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करण्यासाठी धनादेश देण्याऐवजी आता लॅपटॉपच देण्यात येणार आहे.
21 लाभार्थींची निवड
या योजनेंतर्गत 21 लाभार्थींची निवड 2019-20 या आर्थिक वर्षात करण्यात आली होती. पण लॉकडाऊनमुळे लॅपटॉप देण्याची प्रक्रिया रखडली आहे. महापालिकेच्यावतीने लॅपटॉप खरेदी करून लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत.