संशयित आरोपीला न्यायालयाने ठरविले निर्दोष : फिर्यादीला गैरव्यवहार करणे आले अंगलट
प्रतिनिधी /बेळगाव
ट्रकचा व्यवहार करताना दिलेल्या दोन धनादेशाचा दुरुपयोग करून एका महिलेवर खटला दाखल करण्यात आला. व्यवहार करण्यासाठी धनादेश घेण्यात आले होते. मात्र तो व्यवहार रद्द झाला. मात्र ते धनादेश फिर्यादीकडेच राहिले. त्या धनादेशचा गैरवापर करण्याचा प्रयत्न फिर्यादीला चांगलाच अंगलट आला असून या प्रकरणात संशयित आरोपी महिलेची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
शकुंतला हणमंत अडगल (रा. कलादगी) असे निर्दोष मुक्तता झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी आयुबखान दाऊदखान पठाण (रा. चौथा क्रॉस, वीरभद्रनगर, बेळगाव) यांची ट्रक होती. ही ट्रक शकुंतला यांनी घेण्यासाठी करार केला. 27 जुलै 2017 रोजी याबाबत करार झाला. त्यावेळी शकुंतला यांनी आयुबखान याला 1 लाख 10 हजार रुपये रोखदेखील दिले होते. इतर रकमेसाठी त्यांनी हे चेक घेतले होते. त्यानंतर दोघांचा व्यवहार रद्द झाला होता.
आयुबखान यांनी हा व्यवहार रद्द झाला असताना जानेवारी 2018 ला हे धनादेश बँकेत जमा केले. मात्र रक्कम नसल्याने ते वटले नाहीत. एका धनादेशवर 4 लाख 80 हजार तर आणखी एका धनादेशवर 7 लाख 30 हजार असे एकूण 12 लाख 10 हजार अशी रक्कम दाखविण्यात आली होती. याबाबत येथील आठवे जेएमएफसी न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी शकुंतला हिचे वकील जोतिबा पाटील यांनी न्यायालयात कागदपत्रांसह युक्तिवाद केला.
व्यवहारासंदर्भात दिलेले धनादेश हे हातउसणे घेतल्याचे फिर्यादीने म्हटले असले तरी हा व्यवहार झाला होता. हातउसणे किंवा इतर कोणतीही रक्कम शकुंतला यांनी फिर्यादीकडून घेतली नाही. याबाबत कागदपत्रे तसेच साक्षदेखील नोंदविण्यात आली. त्यामध्ये फिर्यादीचे काहीही देणे नसताना या धनादेशचा दुरुपयोग केल्याचे ऍड. जोतिबा पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. धनादेशवरील स्वाक्षरीमध्ये देखील तफावत होती. त्यामुळे संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांची साक्षदेखील यामध्ये नोंदविण्यात आली
होती.
आठवे जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश शेमीदा के. यांनी संशयित आरोपी शकुंतला अडगल यांना निर्दोष ठरविले आहे. कारण फिर्यादीच्या नावावर कर्ज होते. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे तो हातउसणे देणे अशक्मय असल्याने न्यायालयाने संशयित आरोपीला निर्दोष ठरविले आहे. ऍड. जोतिबा पाटील यांनी संशयित आरोपीच्यावतीने काम पाहिले.