वार्ताहर/ टाळसुरे
दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून चंदन सहा (30) या तरुणाचा मृत्यू झाला असून सुरज कुमार (20) हा युवक गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी 18 मे रोजी सकाळी 8 च्या सुमारास घडली.
परशुराम कदम यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या माहितीनुसार, दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात नवीन निवासी इमारतीचे बांधकाम चालू आहे. चंदन सहा, सुरजकुमार व हरेंदर सिंग हे सकाळी 7 वाजता नेहमीप्रमाणे येथे कामाला आले होते. काम सुरू असताना चंदन व सुरज इमारतीवरुन खाली पडले. त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. चंदनला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर सुरज कुमार याला गंभीर दुखापत झाली असून अधिक उपचारासाठी त्याला कराड येथे हलविण्यात आले आहे.
दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे काम बांधकाम शहा कन्स्ट्रक्शन कराड यांना व त्यांनी हंसाळे कन्स्ट्रक्शन सांगली यांना सबकन्स्ट्रक्टर म्हणून हे काम दिले. हंसाळे कन्स्ट्रक्शन यांनी बिहार येथील नागेंद्र प्रसाद यांना आरसीसी बांधकामासाठी नियुक्त केले. नागेंद्र प्रसाद यांच्यामार्फत सुरज कुमार, चंदन सहा व हरेंदर सिंग हे काम करत होते. मंगळवार 18 मे रोजी सकाळी इमारतीवर स्लॅब टाकण्याचे काम 10 वा. सुरू होणार होते. स्लॅबसाठी आवश्यक असणारी मिक्सिंग मशीन येईपर्यंत 6 दिवसापूर्वी टाकलेले खिडकीवरील सज्जाच्या फळ्य़ा व इतर लाकडी साहित्य सोडवण्याचे काम चंदन शहा, सुरज कुमार व हरेंदर सिंग यांनी सुरू केले. चंदन सहा व सुरज कुमार हे पाचव्या मजल्यावरील खिडकीवर असणाऱया सज्जाच्या फळ्य़ा सोडवत होते. त्यावेळी अचानक सज्जा कोसळून दोघेही जमिनीवर आदळले. या अपघातात चंदनच्या डोक्याला व मानेला गंभीर दुखापत झाली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. चंदन सहा हा मूळचा बसिम पट्टी बयाद दा पट्टी निरगुन्डा गोपाळ मंडा उचलका गाव बिहार येथील रहिवासी आहे. त्याच्या पश्चात पत्नी, 3 वर्षाचा व 2 वर्षाचा असे दोन मुलगे आहेत. अंत्यसंस्कारासाठी बिहार येथे घेऊन जाणार असल्याचे परशुराम कदम यांनी सांगितले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास पेलेस उपनिरीक्षक महेश धेंडे करत आहेत.