चिपळूण
माणसाप्रती मुक्या जनावरांचा जिव्हाळा अनेकदा अनुभवास येतो. याचीच प्रचिती अलोरे येथील सुजय गावठे याच्या पॅस्पर कुत्र्याने दिली आहे. दोन दिवसापूर्वी कोळकेवाडी धरणात पोहण्यासाठी गेलेला सुजय अद्यात बेपत्ता आहे. मात्र आपला मालक येत नसल्याचे पाहून या कुत्र्याने त्याच्या आठवणीने गुरुवारी जीव सोडला.
दोन दिवसांपूर्वी कोळकेवाडी धरणात चौघेजण पोहण्यासाठी गेले होते. त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून उर्वरित दोघांपैकी एका तरुणीचा मृतदेह गुरुवारी सापडला. मात्र यावेळी बेपत्ता झालेल्या सुजयचा शोध अद्यापही सुरु आहे. सुजय बुडत असताना त्याचा पॅस्पर नावाचा कुत्रा त्याच्या बरोबरच होता. आपला मालक पाण्यामध्ये बुडताना पाहून त्यानेही पाण्यात उडी मारली आणि मोठय़मोठय़ाने भुंकू लागला. मात्र मालकाला पाण्याबाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न असफल ठरला. पॅस्पर पोहत-पोहत तांबडवाडी येथे बाहेर पडला. त्यानंतर त्याला घरी आणण्यात आले. घरी तो खूप शांत परंतु अस्वस्थ होता. तो जेवलाही नाही. सुजय घरी परत येईल, या आशेने तो वाट पाहत होता. दुसऱया दिवशी त्याला कोळकेवाडी धरणावर घटनास्थळी नेण्यात आले होते. यावेळेस सुजय न दिसल्याने तो व्याकूळ झाला होता. पॅस्परला पुन्हा घरी आणल्यानंतर त्याने घराच्या अंगणातच सुजयच्या आठवणीने आपले प्राण सोडले. प्राण्याच्या या अनोख्या प्रेमाबद्दल सोशल मिडियावर अनेकांनी भावनीक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सुजय दोन दिवसानंतरही बेपत्ताच
बुधवारी सायंकाळी कोळकेवाडी धरणात शाहीन कुट्टिनो, रुद जंगम, ऐश्वर्या खांडेकर व सुजय गावठे पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. त्यापैकी शाहीन व रुद यांना वाचवण्यात यश आले. बेपत्ता झालेल्या ऐश्वर्याचा मृतदेह महाडच्या साळुंखे वॉटर रेस्क्यू टीमने धरणातून बाहेर काढला तर सुजय अद्यापही बेपत्ता आहे. 2 दिवस होऊनही तो न सापडल्याने बचाव पथक त्याचा शोध धरण परिसरात घेत होते. मात्र शुक्रवारी दुपारनंतर हे शोधकार्य स्थगित करण्यात आले.