रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध लांबतच चालले आहे. दरदिनी स्थिती अधिकच बिघडत आहे. युक्रेनच्या डेमीडिव्ह गावातून चिंता वाढविणारे वृत्त समोर आले आहे. रशियाकडून डेमीडिव्ह गावातील धरणावर हल्ला करण्यात आल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी शिरल्याने सैन्याला लोकांना वाचविणे अवघड ठरत आहे.
डेमीडिव्हमध्ये रशियाकडून हल्ले होत असल्याने तेथे अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. रशियाच्या हल्ल्यामुळे धरणाचे नुकसान झाल्याने पाण्याची पातळी वाढून लोकांसमोर आता स्वतःला पुरापासून वाचविण्याचेही संकट उभे ठाकले आहे. आतापर्यंतच्या युद्धात रशियाकडून 1403 वेळा हवाई हल्ले करण्यात आल्याचे युक्रेनने म्हटले आहे. या हल्ल्यांमध्ये 100 हून अधिक मुलांना जीव गमवावा लागला आहे.