प्रतिनिधी / बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी बलिदान मास आचरला जात आहे. फाल्गुन शुक्ल प्रतिपदा (14 मार्च) पासून या बलिदान मासाला प्रारंभ झाला. या निमित्त बेळगावच्या धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या मूर्तीसमोर अभिवादन करून बलिदान मासाला प्रारंभ करण्यात आला.
प्रारंभी संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले. गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींनी लिहिलेल्या संभाजी सूर्य हृदय या श्लोकाचे पठण करण्यात आले. यानंतर धारकऱयांनी सामूहिक मुंडण करून संभाजी महाराजांना आदरांजली वाहिली. बेळगाव परिसरातील शिवप्रतिष्ठानचे धारकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष किरण गावडे धारकऱयांना मार्गदर्शन करताना म्हणाले, 14 मार्च ते 12 एप्रिल (फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या) या दरम्यान धारकरी बलिदान मास आचरणात आणतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. या घटनेची प्रेरणा म्हणून धारकरी हा संपूर्ण महिना सुतक म्हणून पाळतात. एखाद्या गोष्टीचा त्याग करून संभाजी महाराजांचे नित्य पूजन करतात. बेळगाव परिसरात प्रत्येक गावागावात, गल्ल्यांमध्ये बलिदान मास आचरला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला शहरप्रमुख अजित जाधव, कार्यवाह विश्वनाथ पाटील यांच्यासह विभाग प्रमुख, गल्लीप्रमुख, शिवभक्त, धारकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.