प्रतिनिधी /बेळगाव
धर्मांतर बंदी विधेयक याच अधिवेशनात मांडण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. सोमवारी दुपारी सुवर्ण विधानसौधमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत विधेयकासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे. दोन्ही सभागृहात संमत होण्याचा विश्वास असेल तरच विधेयक मांडण्यात येणार आहे.
विधानपरिषदेत विधेयक संमत करण्यासाठी आवश्यक संख्याबळ सत्ताधारी भाजपकडे नाही. या विधेयकाला काँग्रेस, निजदने विरोध केला आहे. विविध संघटनांनीही हे विधेयक नको, अशी सरकारकडे मागणी केली आहे. तरीही दोन दिवसात हे विधेयक मांडण्यासाठी सरकारने तयारी चालवली आहे. मात्र, अत्यंत सावध पाऊल ठेवण्यात येत आहे. विधेयक संमत होण्यासाठी विधानसभेत संख्याबळ आहे. मात्र, विधानपरिषदेत भाजपला संख्याबळ नाही. निजद नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी धर्मांतर बंदी विधेयकाला विरोध केला आहे. जर निजद नेत्यांनी सभागृहात विधेयकाला विरोध करीत सभात्याग केला तर हे विधेयक विधान परिषदेतही संमत होऊ शकते. सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे.