वार्ताहर / माशेल
भोम येथील रहिवासी व भोम अडकोण पंचायतीचे माजी सरपंच धर्मा कृष्णा भोमकर (79 वर्षे) यांचे काल गुरुवार 16 रोजी पहाटे निधन झाले. भोम अडकोण पंचायतीचे विद्यमान सरपंच सुनील भोमकर यांचे ते वडील होत.
धर्मा भोमकर यांचा भोम अडकोण पंचायत क्षेत्रात स्थानिक राजकारणाबरोबरच समाज कार्यातही वावर होता. तीन वेळा त्यांनी सरपंचपद भूषविले होते. तर 25 वर्षे ते पंचसदस्य म्हणून कार्यरत होते. आपल्या राजकीय कारकिर्दीच्या काळात ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दीन यांच्यासोबत त्यांनी काँग्रेसमध्ये कार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, पूत्र शाणू, सुनील, विवाहित कन्या तेजश्री, अलका व शिल्पा, भाऊ तसेच स्नुषा व नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रेला कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, माजी मंत्री दीपक ढवळीकर, माजी आमदार गणेश गावकर, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, सांत आंद्रेचे जिल्हा पंचायत सदस्य धाकू मडकईकर, एसटी महामंडळाचे अध्यक्ष दुर्गादास गावडे, काँग्रेसचे रामकृष्ण जल्मी तसेच विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, जलसिंचन व बांधकाम खात्याचे अभियंते व अन्य मान्यवरांनी उपस्थिती लावली. दुपारी स्थानिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.