- श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे रक्तदानाबाबत जनजागृती
ऑनलाईन टीम / पुणे :
रक्तदान जीवनदान असे आपण सगळेच म्हणतो. मात्र, रक्ताला कोणत्याही धर्म-पंथाच्या सीमा नसतात. कोणत्याही धर्माच्या नागरिकाचे रक्त दुस-या धर्माच्या नागरिकाकरीता वापरता येते. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या बंधू-भगिनींकरीता रक्तदान करा. धर्म कोणताही असो, रक्ताचे नाते एकच आहे, असा संदेश 10 बाय 15 फूट आकारातील भव्य रंगावलीतून देत सामाजिक एकता व रक्तदानाचे आवाहन करण्यात आले.
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र तर्फे रक्तदानाबाबत जनजागृती करण्याकरीता नाना पेठेतील क्षत्रिय किराड धर्मशाळा शितळादेवी मंदिर येथे ही रंगावली साकारण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर पवार, शेखर पवार, रितेश पवार, उमेश वैद्य, राजेश पवार आदी उपस्थित होते. रंगावलीकार सुनील सोनटक्के व वैशाली सोनटक्के यांनी ही रंगावली साकारली.
सागर पवार म्हणाले, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्याचे देणे लागतो, हे कोणीही विसरता कामा नये. महाराष्ट्रामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा असून एक दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्म-पंथ भेद विसरुन समाजाचे देणे देण्यासाठी उभे राहण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. ओम रक्तपेढी, मंगळवार पेठ यांच्या सहकार्याने यावेळी रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये 80 जणांनी रक्तदान केले.