प्रतिनिधी/ सातारा
पाठीमागे सरकारने रशियातून मिलो गहू आणून नागरिकांना खाऊ घातला होता. त्यावेळी संकट होते. परंतु सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात चक्क पाटण तालुक्यातील कडवे खुर्द येथील रेशन दुकानदारांकडून सडलेला गहू वितरीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रेशन दुकान आईच्या नावाने चालवतोय गावचा सरपंच त्यामुळे सडक्या गव्हाची तक्रार करणार तरी कुठे ग्रामस्थ नाक दाबून बुक्यांचा मार सहन करत आहेत. जिल्हा पुरवठा विभागाने याकडे लक्ष घालून किमान ग्रामस्थांना चांगला गहू तरी वितरीत करावा अशी मागणी होत आहे.
सध्या बिकट परिस्थिती बनली आहे. कोरोनामुळे लोकांच्या हाताला काम नाही. खिशात पैसा नाही. त्यातही रेशनवरचे धान्य सडके मिळू लागल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाटण तालुक्यातील कडवे खुर्द येथील रेशन दुकानांमधून चक्क सडका गहु वाटप करण्यात आला. या दुकानात वरची केळेवाडी, रेडेवाडी येथील ग्रामस्थ रेशन नेण्यासाठी जातात. परंतु त्या दुकानात ग्रामस्थांना नाहक त्रास देत असतात. रेशन आणण्यासाठी पाच किलोमीटर चालत जावून सडका गहू पदरात पडू लागताच विचारणा केली असता कोणाकडे तक्रार करायची ती करा. मी कोणास घाबरत नाही, असा सरळ दमच ग्रामस्थांना भरला जातो. काहींचे आधार लिंकींग केले नाही. तर काहींचे रेशन कार्ड घेवून परत दिलेली नाहीत. सडका गहू घेवून शेडमधील जनावरेही त्यांना तोंड लावेनात अशी परिस्थिती झाली असून याकडे पुरवठा विभागाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.