‘इरुला’ आदिवासी भाषेतील चित्रपट
प्रतिनिधी /पणजी
आदिवासी संस्कृती आणि परंपरेच्या पार्श्वभूमीवर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेणाऱया आदिवासी समाजातील मुलीच्या उत्तुंग कथेद्वारे प्रेरित होण्याची संधी यंदाच्या इफ्फीत प्रेक्षकांना मिळणार आहे. ’धाबरी कुरुवी’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना केरळमधील एका आदिवासी मुलीच्या वादळी प्रवासात सामील होता येणार आहे. जे बंधपाश समाजाने तिच्याभोवती आवळले होते त्यापासून स्वतःला मुक्त करण्याचा ती प्रयत्न करते.
‘इरुला’ भाषेतील चित्रपट
मनोवेधक कथानक असलेल्या ’धाबरी कुरुवी’ या चित्रपटामुळे ही संधी मिळणार आहे. ज्यांच्यावर चित्रपट आधारित आहे, त्याच भागातील लोकांना घेऊन बनविलेला भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील अशाप्रकारचा हा पहिलाच चित्रपट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते प्रियनंदन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला पूर्णपणे ’इरुला’ या आदिवासी भाषेत चित्रित करण्यात आले आहे.
येत्या दि. 20 नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू होणाऱया भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर 104 मिनिटांच्या या वैशिष्टय़पूर्ण चित्रपटाचा इफ्फीच्या भारतीय पॅनोरमा विभागात जागतिक प्रीमियरही होणार आहे.
भारतीय सिनेमातील स्वदेशी लोकांच्या चित्रणावर अनेकदा स्टिरियोटाइपच्या पलीकडे पाहण्यात अयशस्वी झाल्याबद्दल टीका होत असते. आदिवासी लोकांची समृद्ध अस्मिता आणि संस्कृतीला न्याय न देणाऱया सिनेमॅटिक परंपरा आणि संस्कृतीमध्ये, ’धाबरी कुरुवी’ नवीन आशा आणि प्रेरणेचे झरे पसरवणाऱया दिव्याच्या रूपात उभे राहण्याची अपेक्षा आहे.
आदिवासी लोकांच्या कहाण्या
इरुला भाषेत धाबरी कुरुवी म्हणजे ’अज्ञात बाप असलेली चिमणी’. आदिवासी लोककथेचा एक भाग असलेला पौराणिक पक्षी, शांतपणे दुःख सहन करणाऱया, अन्यायाच्या बेडय़ा तोडण्यासाठी तळमळणाऱया, ज्यांच्या व्यथा आणि संघर्ष चित्रपट प्रकाशात आणू पाहतो अशा न पाहिलेल्या लोकांच्या न सांगितल्या जाणाऱया कहाण्या या चित्रपटातून दर्शविण्यात आल्या आहेत.
आयुष्यात चित्रपट न पाहिलेले कलाकार
केरळ राज्यातील अनुसूचित जमाती वस्ती असलेल्या अट्टापाडी येथील इरुला, मुदुका, कुरुंबा आणि वडुका आदिवासी समुदायातील लोक ज्यांच्यापैकी काहींनी स्वतःच्या संपूर्ण आयुष्यात एकही चित्रपट पाहिला नव्हता, असे सुमारे 60 लोक या चित्रपटातून अभिनेते बनले आहेत.
चित्रपटासाठी दिले खास प्रशिक्षण
कलाकारांची निवड करण्यासाठी सुमारे 150 लोकांना खास अभिनय कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून मीनाक्षी, श्यामिनी, अनुप्रसोभिनी आणि मुरुकी यांची मुख्य भूमिकांसाठी निवड करण्यात आली. त्याशिवाय अन्य कलाकारांमध्ये गतवषी सर्वोत्कृष्ट स्त्री गायिकेचा 68वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळविणाऱया नानजियाम्मा या अट्टाप्पाडी येथील आदिवासी महिलेचाही समावेश आहे.
केवळ आदिवासी कलाकारांना घेऊन बनविण्यात आलेला ’धाबरी कुरुवी’ एकमेव फीचर फिल्म असून यूआरएफमध्ये विश्वविक्रम केला आहे. त्याशिवाय केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीही या चित्रपटाची निवड झाली आहे.