खेड / प्रतिनिधी :
तालुक्यातील धामणदेवी येथील इब्राहिम अब्दुला फिरफिरे यांचे घर फोडून ३ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोघांच्या येथील पोलिसांनी मुसक्या आवळल्या. डोंबिवली येथून चोरलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. अजिंक्य मोहिते , दीपक लिल्हारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून या दोघांना चिपळूण येथून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. १६ नोव्हेंबर रोजी धामणदेवी येथील इब्राहिम फिरफिरे यांच्या मालकीचे घर फोडून ३ लाखांचे किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता . याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना यापूर्वी चोरीप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र धामणदेवी चोरीबाबत ते दोघेही काहीही माहिती देत नव्हते. मात्र पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी शास्त्रीय व तांत्रिक तपास केल्यानंतर दोघांनी धामणदेवीतील घरफोडीची कबली दिली. चोरीनंतर या दोघांनी डोंबिवली येथे वास्तव्य केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाले.
पोलिसांनी खाक्या दाखविल्यानंतर डोंबिवली येथील सराफाकडे दागिने गहाण ठेवल्याचे व काही दागिने मित्राकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम व पथकाने डोंबिवली येथे जावून सराफासह मित्राकडे ठेवलेले दागिने हस्तगत केले. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, पोलिस कॉन्स्टेबल विवेक साळवी, भूषण सावंत, पोलीस शिपाई रूपेश जोगी यांनी ही घरफोडी उघडकीस आणली.