हजारोंच्या संख्येने जमलेल्या भाविकांचा ज्ञानोबा माऊलींचा जयघोष : अश्वांचा रिंगण सोहळा वैष्णवांच्या डोळय़ांचे पारणे फेडणारा
वार्ताहर /धामणे
धामणे येथे सोमवारी अवघी पंढरीनगरी अवतरली. अमाप उत्साहात टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा ज्ञानोबा माऊलांच्या जयघोषात हजारो वैष्णवांच्या उपस्थितीत आळंदी-पंढरपूर दिंडीतील अश्वांचा उभा आणि गोल रिंगण सोहळा उत्साहात झाला.
हा रिंगण सोहळा हभप पुंडलिक महाराज देहूकर, तुकोबा महाराजांचे 11 वंशज, हभप पूर्णानंद काजवे महाराज, कोगनोळी, हभप बाळू भक्तीकर महाराज, हभप महेंद्र पाटील महाराज, चिकलवा कीर्तनकारांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी वारकरी संप्रदायाने भागवत धर्म मंदिराची उभारणी केलेल्या सांप्रदायाची ज्योत धामणे गावात प्रकटल्याचा भास
झाला. दि. 7 रोजी पहाटे काकड आरती होऊन ज्ञानेश्वरी वाचन झाल्यानंतर सकाळी 8 ते 9 हभप मारुती महाराज सांबरेकर धामणे यांचे कालाकीर्तन झाले.
माऊली पालखी आणि आळंदी-पंढरपूर पायी दिंडीतील अश्वांच्या सहभागात धामणे पंचक्रोशीतील अनेक गावांनी दिंडय़ांच्या उपस्थितीत उभ्या रिंगणचे पूजन संजय पाटील (बिल्डींग कॉन्ट्रक्टर धामणे), एम. के. पाटील (ग्रा. पं. सदस्य, धामणे), अभिषेक कलघटगी, महेश डुकरे (बिल्डींग कॉन्ट्रक्टर), त्याचप्रमाणे गोल रिंगणचे पूजन उमेश डुकरे (बिल्डींग कॉन्ट्रक्टर), पुंडलिक हंगरगेकर, किरण चतुर, गंभीर पाटील, अरुण रेमाणाचे, राजू चोण्णद (राईस मिल) यांच्या हस्ते झाले.
महाप्रसादाने सोहळय़ाची सांगता
सात दिवस विविध भरगच्च कार्यक्रमांनी पार पडलेला येथील श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हभप जोतिबा चौगुले, अलतगा यांच्या अधिष्ठानाखाली पार पडला. सोमवारी दुपारी 2 वाजता महाप्रसादाने या सोहळय़ाची सांगता झाली.