वार्ताहर /धामणे
हरहर महादेवच्या जयघोषात धामणे येथील बसवाण्णा देवाचा दोन दिवस यात्रा उत्सव पारंपरिक आणि विधिवत इंगळय़ांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रतिवर्षाप्रमाणे सोमवार दि. 28 रोजी येथील बसवाण्णा देवाची यात्रा पारंपरिक पद्धतीने हरहर महादेवाच्या जयघोषात इंगळय़ांच्या गाडय़ाने सुरू झाली. सकाळपासून कलमेश्वर मंदिरपासून सवाद्य बैलजोडय़ा जुंपून गुलालाची उधळण करत बसवाण्णा मंदिरपर्यंत मिरवणूक येऊन येथील बसवाण्णा मंदिर आवारात इंगळय़ा झाल्या. दुपारी 4 वाजता गावातील हक्कदारांनी अंबील गाडय़ांची देवस्थान पंचकमिटीच्या सानिध्यात सवाद्य मिरवणूक निघाली. बसवाण्णा मंदिर येथे अंबिलीचे वाटप करण्यात येऊन परंपरेप्रमाणे गाडे पळविण्यात आले. रात्री 10.30 वाजता कन्नड शाहीर गाण्यांचा कार्यक्रम झाला. मंगळवार दि. 29 रोजी सकाळी 9 नंतर गावातील प्रत्येक मंडळाच्यावतीने सजविलेल्या बैलजोडय़ांची सवाद्य मिरवणूक निघाली. दुपारी एक वाजता देवस्थान पंचकमिटीच्यावतीने बसवाण्णा मंदिरासमोर इंगळय़ांचे विधिवत पूजन करून त्या पेटविण्यात आल्या. सायंकाळी पाच वाजता हजारो भाविकांच्या आणि देवस्थान पंच व हक्कदार यांच्या उपस्थितीत बसवाण्णा देवाला बाशिंग बांधण्यात येऊन विधिवत पूजन करून इंगळय़ांमध्ये नारळ उडविण्यात आले. त्यानंतर इंगळय़ांचे विधिवत पूजन करून देवाला गाऱहाणे घालण्यात येऊन इंगळय़ा नहाण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी शेकडो भाविकांनी देवाचे दर्शन घेतले. रात्री 11 वाजता कोल्हापूर येथील मराठी नाटय़प्रयोग सादर करण्यात आले.