वार्ताहर / धामणे
भात पेरणी झालेल्या पंधरा दिवसांच्या अवधीतच मृग नक्षत्राने गेल्या चार दिवसांपासून जोर केल्याने धामणे, जुने बेळगाव शिवारातील भातपीक धोक्यात आले असल्याने येथील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
धामणे ते जुने बेळगाव या पाच किलोमीटर परिसरात सुपिक जमीन असल्यामुळे पावसाळी भात पेरणी केली जाते. यावर्षी पावसाळ्याला सुरुवात होण्याच्या पंधरा दिवस आधी या भागातील शिवारात भात पेरणी पूर्ण झाली आहे. काही शेतकऱयांच्या शेतातील भाताची रोपे दिसत आहेत. काही ठिकाणी भात उगवणे सुरू असतानाच संततधार पाऊस पडत आहे. येथील नाले भरून शिवारात पाणी शिरल्याने शेतीचे बांध फुटून सर्व शेती पाण्याखाली आली आहे. त्यामुळे धामणे व जुने बेळगाव येथील भातपीक धोक्यात आले असल्याने येथील शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे.
धामणे आणि बस्तवाड शिवारातून येणारे दोन्ही नाले जुने बेळगाव शिवारातून जाणाऱया बळ्ळारी नाल्याला मिळतात. परंतु सततच्या मुसळधार पावसामुळे या नाल्यांना महापूर आला आहे. नाल्याचे बांध फुटून शिवारातील शेतांचे बांध फुटून जुने बेळगाव शिवारात हे पाणी साचल्याने बळ्ळारी नाल्यालगतची सर्व शेती पाण्याखाली आली आहे. येथील नुकतेच पेरणी केलेले भातपीक पाण्याखाली आल्याने जुने बेळगाव येथील शेतकरीवर्गात चिंता पसरली आहे.
यंदा पावसाने लवकरच जोर धरल्याने नुकतेच पेरणी केलेले भात उगवणार नसल्याची भीती शेतकऱयांना लागून राहिली आहे.