मंगळवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम उत्साहात
वार्ताहर /धामणे
धामणे येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मीची ओटी भरण्याचा तसेच जीर्णोद्धार करण्यात येत असलेल्या मंदिराच्या गाभारा चौकटीची सवाद्य मिरवणूक असा संयुक्त कार्यक्रम मंगळवारी पार पडला.
देवस्की पंचकमिटीच्यावतीने प्रतिवषी गावामध्ये श्रावणामध्ये सोमवार व मंगळवार वार पाळून चौथ्या किंवा पाचव्या मंगळवारी महालक्ष्मीची ओटी भरण्यात येते. त्यानुसार मंगळवारी माणिक बडीगेर बंधू यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर देवस्की पंच आणि विविध हक्कदारांच्यावतीने ओटी भरून महाआरती करण्यात आली. त्यानंतर धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील भक्तांच्यावतीनेही ओटी भरण्यात आली.
मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे आले असून आता कळसाचे काम सुरू आहे. गाभाऱयाची चौकट बसवंत दुदू बाळेकुंद्री (बिल्डींग कॉन्ट्रक्टर, धामणे) यांनी देणगीदाखल दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कलमेश्वर मंदिरात बसवंत यांच्या हस्ते या चौकटीचे पूजन करून गावात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीची सांगता महालक्ष्मी मंदिरात झाली. या मिरवणुकीत देवस्की पंच बाबा पाटील, श्रीकांत डुकरे, महादेव चौगुले, विनोद अकणोजी, पारीस शहापुरी, अशोक कामशेट्टी, जोतिबा धर्मूचे, बाळू बेळगावकर, परशराम रेमाणाचे, मुरारी लोकळुचे, कल्लाप्पा बाळेकुंद्री, मल्लाप्पा मजुकर, ग्रा. पं. सदस्य एम. के. पाटील, राजू बडीगेर तसेच धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील भाविक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.