कानूर / वार्ताहर
धामापूर ता.चंदगड येथील श्री.संतोष लक्ष्मण गावडे (वय 36 ) हे रात्री शेताकडे राखणीला जात असताना पाणंद रस्त्यावर अचानक गव्याने (Indian Bison) हल्ला केल्याने ते जखमी झाले. जखमी गावडे यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र चंदगड येथे दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पुढील उपचारासाठी गडहिंग्लज येथे पाठवण्यात आले आहे.
गव्याने हल्ला केलेल्या घटनास्थळी जाऊन वनक्षेत्रपाल डी. जी. राक्षे, वनपाल ए. डी. वाजे, वनरक्षक के. एस. पताडे यांनी प्रत्यक्ष जाग्यावर जाऊन घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला.
संतोष गावडे हे काल रात्री जेवण आटपून शेताकडे जात होते बाजार गोंड नावाच्या शेतात गावाने हल्ला केल्याने संतोष गावडे जखमी झाले आहेत. वन्यप्राण्यांमुळे शेती आणि शेतकरी सुरक्षित राहिला नाही तेव्हा सरकारने वेळीच लक्ष देऊन नुकसानभरपाई वेळेत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.