धामोड / वार्ताहर
धामोड( ता. राधानगरी ) येथील मुख्य बाजारपेठेत चार दुकाने फोडून भुरटया चोरटयांनी रोख रक्कम व अन्य साहीत्य लंपास केले. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून याबाबत राधानगरी पोलिसात अज्ञात चोरटया विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील बाजारपेठेतील सुरेश घाटगे यांच्या गणेश बिअर बारच्या मागील बाजूचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी सुमारे ९५ हजार रुपयांची बियर दारू तसेच रोख पाच हजार रुपये व चेकबुक चोरून नेले आहे. दिलिप पाटील ( मिस्त्री ) यांच्या इलेक्ट्रिक दुकानातून पाण्याचे हेड दाखवणारे ३८ हजार रुपयांचे मशिन, रोख ३६० रुपये व अन्य साहीत्य चोरटयांनी चोरले . सुरेश दुरगुळे यांच्या कृषी सेवा केंद्र व जंगम पान शॉप येथेही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी झाला. याबाबत राधानगरी पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.