प्रतिनिधी / मालवण:
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार ठोस पावले उचलत असतानाच केंद्र सरकारच्या आयसीएमआर या संशोधन संस्थेने कोरोना लस संशोधनासाठी भारतातील ज्या सर्वोकृष्ट बारा हॉस्पिटलची निवड केली आहे, त्यात गोवा-धारगळ येथील डॉ. सागर विवेक रेडकर संचलित रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे डॉ. सागर रेडकर हे सिंधुदुर्गातील मालवण, रेडी येथील डॉ. विवेक रेडकर यांचे सुपूत्र. डॉ. विवेक आणि डॉ. सागर रेडकर या पिता-पुत्रांनी इटली येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय चेस्ट कॉन्फरन्समध्ये कोरोना उपचाराबाबत जगात चालणाऱया संशोधनाचा आढावा घेतला होता. त्यामुळे त्यांच्या या संशोधन प्रबंधाची व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारा निवड झाली होती. त्यामुळे कोरोना लस संशोधनासाठी या हॉस्पिटलच्या झालेल्या निवडीला मोठे महत्व आहे.
केंद्रीय आयुषमंत्री डॉ. श्रीपाद नाईक यांनी नुकतीच धारगळ येथील रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरला अचानक भेट देत पाहणी केली आणि त्यांनी रेडकर हॉस्पिटलची कोरोना लस संशोधनासाठी आयसीएमआर तसेच केंद्र सरकारने निवड केल्याबद्दल अभिनंदन केले. डॉ. सागर रेडकर, डॉ. धनंजय लाड व त्यांच्या संशोधन टिमला पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. याबाबतचे वृत्त आज सिंधुदुर्गसह गोव्यात पसरताच डॉ. रेडकर पिता-पुत्रांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रेडकर हॉस्पिटलची झालेली ही निवड गोवा आणि कोकणवासियांसाठी गौरवास्पद आहे. डॉ. विवेक रेडकर आणि डॉ. सागर रेडकर यांनी इटली येथे होणाऱया आंतरराष्ट्रीय चेस्ट कॉन्फरन्समध्ये कोरोना ट्रीटमेंटबाबत जगात चालणाऱया संशोधनाचा आढावा घेतला. त्यांचा हा संशोधन प्रबंध व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारा सिलेक्ट झाला होता. कोरोनावर कोकण व गोवा विभागातून सिलेक्ट झालेला हा पहिला संशोधन प्रबंध होता. गेल्या तीन वर्षांत रेडकर हॉस्पिटलतर्फे डॉ. सागर रेडकर, डॉ. सुप्रिया रेडकर व डॉ. विवेक रेडकर यांनी जर्मनी, अमेरिका, दुबई, न्युझिलंड येथे होणाऱया अमेरिकन डायबेटीक असोसिएशन, युरोपियन कार्डियाक असोसिएशन अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कॉन्फरन्ससमध्ये आपले संशोधन प्रबंध सादर केले. त्यांच्या या संशोधनामुळे ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया हॉस्पिटलला पुन्हा मान्यता मिळाली असून त्यांची इथिकल कमिटीतही नामांकित डॉक्टर्स व संशोधक कार्यरत असल्याची माहिती रेडकर हॉस्पिटलचे प्रसिद्धीप्रमुख प्रवीण सावंत दिली. दरम्यान, भारत सरकारच्या कोरोना लस संशोधनात गोपनियता असल्यामुळे लसीसंबंधीच्या सर्व बातम्या या सरकारच्या आयसीएमआर या साईटवरून देण्यात येणार असल्याने डॉ. सागर रेडकर यांनी सांगितले.