प्रतिनिधी /पेडणे
धारगळ येथे गुरुवारी 24 रोजी सकाळी टेलर ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागून केबिन जळून खाक झाले.पेडणे अग्निशामक दलाला आग लागल्याची माहिती देण्यात आली. पेडणे अग्निशामक दलाचे जवान व अधिकारी नामदेव परवार तत्काळ घटनास्थळी हजर झाले. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा उपयोग करून ती आग विझवली. यात टेलर ट्रकचे सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले, तर अग्निशामक दलाने मोठे नुकसान होण्यापासून वाचवले. टेलर ट्रक नंबर, आरजे. 19 जी जी 0562 असून तो राजस्थान येथून गोव्यात मार्बल घेऊन आला होता. मार्बल खाली करुन परत जात असताना धारगळ येथे पेट्रोल पंपजवळ गाडी पार्क केली होती. यावेळी वाहनाच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली व यात टेलर ट्रकचे केबिन खाक झाले, मात्र इंजिन व इतर भाग जळण्यापासून वाचविण्यास पेडणे अग्निशामक दलाला यश आले.
पेडणे अग्निशामक अधिकारी नामदेव परवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फटू नाईक, चालक शैलेश हळदणकर, जवान विकास चव्हाण, लक्षदीप हरमलकर व म्हापसा अग्निशामक दलाच्या सहकार्याने ही आग विझवण्यात आली.