कॅसिनो, हॉटेल, वॉटर पार्क, कनव्हेंशन सेंटर उभारणार : खाणग्रस्त कर्जफेड ओटीएस योजनेस वर्षाची मुदतवाढ,कोरोना उपचार, साहित्यासाठी 4.30 कोटी मंजूर,व्यवसायिक अभ्यासक्रम शिक्षकांना मिळणार पगारवाढ
प्रतिनिधी /पणजी
धारगळ येथील 3.82 लाख चौ.मी. जमीन डेल्टा कॉर्पोरेशनला देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने काल सोमवारी मान्यता दिली असून तेथे कंपनीतर्फे कॉसिनो, हॉटेल, वॉटर पार्क, कनव्हेंशन सेंटर असे प्रकल्प उभारले जाणार आहेत. खाणग्रस्तांसाठी एकरकमी कार्जफेड योजना पुन्हा एकदा 12 महिन्यांसाठी वाढवण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कोरोनाचे उपचार व साहित्याच्या खरेदीसाठी रु. 4.30 कोटीच्या तरतुदीला मंत्रिमंडळाने संमती दिली. हायस्कूल, हायरसेंकडरीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांना पगारवढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
धारगळ येथील संभाव्य कॉसिनोच्या विषयावरुन उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व एकंदरीत सरकारवर मंत्रिमंडळ बैठकीत जोरदार हल्लाबोल केला. सदर कॅसिनोला त्यांनी आक्रमक विरोध करुन आक्षेप घेतला.
प्रवीण आर्लेकर यांना भाजपात प्रवेश दिल्यामुळे आणि पेडणेतून भाजपची उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याचा सुगावा लागल्यामुळे आजगांवकर क्रोधीत बनले होते. तो सर्व राग त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रकट केला. मंत्रिमंडळाची ही निवडणुकीपूर्वीची शेवटची बैठक असल्याचे निदान करण्यात आल्यामुळे त्यात पेडणे कॉसिनोला मान्यता देण्याचा निर्णय घेण्याचा डॉ. सावंत यांचा इरादा होता. परंतु आजगांवकरांनी त्या निर्णयास ‘खो’ घातला आणि जोरदार विरोध दर्शवला. पेडण्यातील जनतेला कॅसिनो नको आणि तो खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यास मंत्री या नात्याने अनुमती देणार नाही असे सांगून आजगावकर यांनी डॉ. सावंत यांच्यावर हल्लाबोल केला. कॉसिनोच्या प्रश्नावर आजगांवकरांनी बैठकीत हंगामा करुन तो येऊ देणार असे ठणकावून सांगितले. पेडणे मतदारसंघात रोजगारासाठी कॅसिनोची गरज नाही. इतर अनेक प्रकल्पातून पेडणेकरांना रोजगार मिळणार असून तो आपण मिळवून देणार आहे. कॅसिनो प्रकल्पास आपला विरोध कायम असून त्यास रोखण्यासाठी पेडण्यात आंदोलन चालू आहे. सरकारने कॅसिनो लादला तर पेडणेकर रस्त्यावर उतरतील, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
आपण सरकार घडवले व टिकवले असतानाही आता वाईट वागणूक मिळत असून पेडण्यात सरकारने नोकऱयांच दिल्या नाहीत असा टोमणा त्यांनी मारला आणि सावंत सरकारला घरचा आहेर दिला.