तेंडोलीत तरुणाच्या कृत्याने खळबळ : झाडाला बांधून पोलिसांना पाचारण
वार्ताहर/ कुडाळ
तेंडोली-कुंभारवाडी येथील एकनाथ अंकुश पाटकर (42) या तरुणाने मंगळवारी सायंकाळी धारदार हत्याराने स्वत:चा गळा चिरण्याचा प्रयत्न केला.
तेथील कुमणोसवाडी येथे रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेला एकनाथ सैरभैर वागू लागला. एका बुलेटवर दगड मारून नुकसान केले, तर ग्रामस्थांवरही दगड मारण्याचा प्रयत्न केला. अखेर ग्रामस्थांनी त्याला झाडाला बांधून निवती पोलिसांना बोलावले. नंतर रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरला बांधून त्याला येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
तेथील कुंभारवाडी येथे एकनाथ याचे घर आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तेथील कुमणोसवाडी येथील रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेला तो ग्रामस्थांना दिसला. एका धारदार हत्याराने स्वत:चा गळा चिरल्याने त्याला जखम होऊन मोठा रक्तस्त्राव सुरू होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस पाटील संजय नाईक, सरपंच मंगेश प्रभू व ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली.
ग्रामस्थांवरही दगडफेक
एकनाथ याला उपचारासाठी दाखल करण्याच्या हालचाली ग्रामस्थांनी सुरू करताच तो सैरभैर वागू लागला. ग्रामस्थांच्या अंगावर धावून जात धुडगूस घालू लागला. तेथे उभ्या करून ठेवलेल्या एका बुलेटवर दगड मारून नुकसान केले. ग्रामस्थांवरही त्याने दगड मारण्याचा प्रयत्न केला. अखेर ग्रामस्थांनी त्याला तेथील झाडाला बांधून ठेवले. नंतर संजय नाईक यांनी निवती पोलिसांना कल्पना देताच हवालदार सुनील सावंत व सायमन डिसोजा घटनास्थळी दाखल झाले.
स्ट्रेचरला बांधूनच रुग्णालयात दाखल
पोलिसांनी 108 रुग्णवाहिका मागविली. एकनाथ याला रुग्णवाहिकेतील स्ट्रेचरला बांधूनच येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉ. सौ. एस. पी. पंडित यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, एकनाथ याने दगड मारून बुलेटचे नुकसान केल्याची तक्रार संबंधित बुलेट मालकाने निवती पोलिसांत दिली आहे.