मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचे उद्गार : गोवा मल्टिफेकल्टी कॉलेजच्या नूतन इमारतीचा शिलान्यास
प्रतिनिधी / धारबांदोडा
धारबांदोडा तालुका हा आजवर संजीवनी साखर कारखान्यामुळे ओळखला जात होता. मात्र भविष्यात हाच तालुका विद्यानगरी व पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखला जाणार आहे. धारबांदोडय़ात असलेल्या सरकारी जागेत राष्ट्रीय कायदा विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांचे धारबांदोडय़ातील जनतेने स्वागत केले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दयानंदनगर येथील गोवा मल्टी फेकल्टी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या शिलान्यास सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर एनआरआय ऍड. नरेंद्र सावईकर, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर, सावर्डेचे माजी आमदार मोहन आमशेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महाविद्यालयाचे अध्यक्ष गणेश गांवकर, प्राचार्य शेख मोहम्मद परवेझ अल उस्मानी, धारबांदोडा पंचायतीच्या सरपंच स्वाती तिळवे, दाभाळ पंचायतीच्या सरपंच शकुंतला गांवकर, सौ. सदिच्छा गावकर, अरुण बिचोलकर, संदीप प्रियोळकर, दत्त देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र देसाई हे उपस्थित होते.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्या गावोगावी शिक्षणाचा प्रसार झाला. भाऊसाहेबांनी उभारलेल्या शाळांचे नूतनीकरण भाजपा सरकारने 2012 सालापासून सुरु केले आहे. आज गोव्यात 95 टक्के शाळांचे नूतनीकरण पूर्ण झाले असे, सांगून शैक्षणिक क्षेत्रात साधनसुविधा निर्माण करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
धारबांदोडय़ाची ओळख ही खाण पट्टा म्हणून होती. मात्र आता या तालुक्याची वाटचाल खाण उद्योगातून, कृषी क्षेत्राकडे, कृषी क्षेत्रातून पर्यटनाकडे तर पर्यटन क्षेत्रातून शिक्षण क्षेत्राकडे होत असल्याचे ऍड. नरेंद्र सावईकर म्हणाले.
गणेश गांवकर यांनी माजी मुख्य़मंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या साहाय्याने गोवा मल्टी फेकल्टी महविद्यालयाची स्थापना केली. त्यावर कळस मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत चढविला. या संस्थेमुळे स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे दालन खुले झाले असे खासदार विनय तेंडुलकर म्हणाले. कमी खर्चात शिक्षण देणारी गोवा मल्टी फॅकल्टी कॉलेज ही धारबांदोडा तालुक्यात आहे. गणेश गांवकर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही शिक्षण संस्था असून शैक्षणिक क्षेत्रात गोवा सरकार कुठेच कमी पडलेले नाही. गेल्या दहा वर्षांपासून सावर्डे मतदारसंघाचा विकास होत आहे. निवडणुका येतील व जातील मात्र सर्वांनी एकसंघ राहून सावर्डेचा विकास केला पाहिजे, असे बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यावेळी म्हणाले.
सरपंच स्वाती तिळवे म्हणाल्या, धारबांदोडय़ात शैक्षणिक हब होत असेल्यास पंचायत त्याचे आनंदाने स्वागत करेल.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याहस्ते गोव्यातील नामवंत शिक्षकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. गोवा मल्टी फेकल्टी कॉलेजतर्फे मुख्यमंत्री व इतर मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. अरुण बिचोलकर यांनी संस्थेचा अहवाल सादर केला. गणेश गांवकर यांनी स्वागत केले तर प्राचार्य शेख मोहम्मद परवेझ अल उस्मानी यांनी आभार प्रदर्शन केले.
गणेश गांवकर व त्यांच्या पत्नी सौ. सदिच्छा गांवकर यांचा वाढदिन केक कापून साजरा करण्यात आला.