प्रतिनिधी / धारबांदोडा
नेहमीच गजबजलेल्या कुळे बाजारपेठेत गेल्या तीन दिवसांपासून शुकशुकाट पसरला आहे. शेजारील मोले बाजारपेठेतही अशीच सामसूम पाहायला मिळते. बुधवार 10 जून रोजी कुळे-शिगाव भागात कोरोनाचे दोन रुग्ण पोझिटिव्ह सापडल्यानंतर कुळे-शिगांव ग्रामपंचायतीने 16 जूनपर्यंत पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यापाठोपाठ शेजारील मोले ग्रामपंचायत व साकोर्डा पंचायतने अशीच स्वयंघोषित बंदी लागू केली आहे. धारबांदोडा पंचायतही लॉकडाऊनच्या निर्णयाप्रत आल्याने दाभाळ-किर्लपाल पंचायत सोडल्यास धारबांदोडा तालुका ऐंशी टक्के लॉकडाऊन झाला आहे.
कुळे-शिगाव, मोले व साकोर्डा भागात नागरिकांकडून लॉकडाऊनला जो उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला ते पाहता नागरिक आपल्या आरोग्याबाबत किती दक्ष आहेत हे या स्वेच्छा बंदीतून दिसून आले. तिनही पंचायत क्षेत्रात अत्यावश्यक सेवांबरोबरच बँका व टपालसेवा तेवढी खुली आहे. शनिवार व रविवारच्या दिवशी त्यांना सुट्टी असल्याने लोक तेथे फिरकण्याचा प्रश्नच नव्हता. कुळे शिगाव पंचायत 16 जूनपर्यंत, मोले पंचायत 15 जूनपर्यंत तर साकोर्डा पंचायत 14 जूनपर्यंत लॉकडाऊन पाळणार आहे. धारबांदोडा पंचायतीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत सोमवारपासून पुढील दोन ते तीन दिवस लॉकडाऊन करण्याची तयारी ठेवली आहे.
धारबांदोडा तालुक्यात पाच ग्रामपंचायतींचा समावेश असून त्यापैकी 4 पंचायतींनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. दाभाळ-किर्लपाल पंचायतीचा निर्णय अद्याप कळू शकलेला नाही. त्यामुळे ऐंशी टक्के धारबांदोडा तालुका लॉकडाऊनखाली आला आहे.
सर्व अहवाल नकारात्मक
कुळे शिगाव भागात सापडलेल्या दोघा कोरोनाबाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले आहेत. तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून कुळे शिगावसह शेजारील इतर चार पंचायतींनी लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद लाभत आहे. या भागातील सर्व व्यवहार बंद असले तरी मोन्सूनच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरीवर्ग सध्या भातशेती व भाजी लागवडीमध्ये गुंतलेले सुखद चित्र पाहायला मिळते.