बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांचे आश्वासन
प्रतिनिधी / धारबांदोडा
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील जास्तीत जास्त विकासकामे येत्या मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असून सर्व रस्ते हॉटमिक्स करण्यात येतील. भुमिका नगर व प्रताप नगरमध्ये राहणाऱया ग्रामस्थांच्या घरांचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याचा प्रयत्न असून काही राजकीय लोक त्यावर विनाकारण राजकारण करीत आहेत. मात्र यापुढे या रहिवाशांचा प्रश्न निकाली काढला जाईल, असे आश्वासन बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी दिले.
आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा या उपक्रमातंर्गत गोवा खादी ग्रामोद्योग महामंडळातर्फे आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिराला ते बोलत होते. गोव्यात पूर्वी पासून अनेक योजना कार्यरत आहेत. मात्र त्यांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नव्हती. या योजना जनतेपर्यंत पोचविण्यासाठी सरकारी पातळीवर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर धारबांदोडा तालुक्याचे उपजिल्हाधिकारी केदार नाईक, साकोर्डाचे सरपंच जितेंद्र नाईक, कुळे शिगांवचे सरपंच गंगाराम लांबोर, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे संचालक कमलाकांत नाईक, महामंडळाचे अधिकारी विजयानंद नाईक, अंकुश नाईक उपस्थित होते.
गरजूंना सरकारी योजनासाठी लागणारी कागदपत्रे तयार करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालय पुढाकार घेणार असून नागरिकांनी त्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केदार नाईक यांनी केले. काही अडचणी असल्यास थेट आपल्यापर्यंत यावे असे असेही त्यांनी सांगितले. व्यवसाय करण्यासाठी खादीग्रामोद्योग हा चांगला पर्याय असून इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. स्वतः स्वयंपूर्ण बनून इतरांना रोजगार देण्याची ताकद खादी ग्रामोद्योगामध्ये आहे. या महामंडळातून धारबांदोडा तालुक्यातील अधिकाधिक लोकांना लाभ मिळावा यासाठी अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जात आहेत, असे महामंडळाचे संचालक कमलाकांत नाईक म्हणाले. सरपंच जितेंद्र नाईक यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. अंकुश नाईक यांनी सूत्रसंचालन तर रुपेश देसाई यांनी आभार मानले. त्यानंतर विजयानंद नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.