वार्ताहर / उसगाव
ओंकाब धारबांदोडा येथे लोकवस्तीजवळ फिरताना आढळलेल्या बिबटय़ाला वनखात्याच्या पथकाने सुरक्षितरित्या पकडून त्याची बोंडला अभयारण्यात रवानगी करण्यात आली आहे. रविवारी सकाळी 10.30 वा. सुमारास संजीवनी साखर कारखान्याजवळ हा बिबटय़ा रस्ता ओलांडताना नागरिकांच्या नजरेस पडला होता.
वन्यजीव विभागाचे अधिकारी दीपक बेतकीकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनखात्याच्या रेस्क्यू पथकाने साधारण 6 तासांच्या प्रयत्नानंतर या बिबटय़ाला पिंजऱयात जेरबंद करण्यास यश मिळविले. वनखात्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर बिबटय़ा नर असून त्याचे वय 6 ते 7 महिने आहे. एखाद्या अपघातात जखमी झाल्याने त्याच्या हालचाली मंदावल्याची शक्यता आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ओंकाब भागात रस्ता ओलांडताना या बिबटय़ाला काही लोकांनी पाहिले होते. विनोद कुर्टीकर या स्थानिकाने वनखात्याला त्यासंबंधी माहिती दिली. वनखात्याचे पथक घटनास्थळी पोचेपर्यंत बिबटय़ा दाट झाडीत शिरला होता. सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर त्याला जेरबंद करण्यात यश आले. या पथकामध्ये वनअधिकारी दीपक बेतकीकर, प्रज्योत नाईक, देऊ शेटकर, सचिन सावंत, राजन गावकर, संदेश घष्टी, दीपा रेडकर, प्रमोद मळीक, कमलाकांत कुर्टीकर, रामा दिर्गुणकर यांचा समावेश होता.