कोविड रुग्णांवर उपचारासाठी प्रशासन सज्ज
वार्ताहर / हुबळी
धारवाड आणि हुबळीतील किम्स इस्पितळ आवारात नव्याने निर्माण होत असलेल्या माता आणि शिशू आरोग्य केंद्रामध्ये अतिरिक्त 425 ऑक्सिजन बेड पुरविण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली आहे. पुढील सात दिवसांत ही व्यवस्था केली जाणार आहे.
किम्समधील निर्मितीच्या टप्प्यात असलेल्या माता आणि शिशू आरोग्य केंद्राला केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. येत्या 1 मे पर्यंत आवश्यक पायाभूत सुविधा पुरवून कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन सुविधा असणारे बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी सूचना प्रल्हाद जोशी यांनी कंत्राटदारांना दिली. 20 कोटी रुपये खर्चुन निर्माण करण्यात येणाऱया या इस्पितळाच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर अलिकडेच पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अग्नीशमन व्यवस्था, पाणी आणि भुयारी गटार निर्माण करून या भागात कोविड रुग्णांसाठी उपचाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात येणार आहे.
पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, नॅशनल अर्बन हेल्थ स्किम अंतर्गत 2017 मध्ये केंद्र सरकारने किम्स इस्पितळाच्या आवारात व धारवाडमध्ये माता-शिशू इस्पितळ निर्माण करण्यासाठी प्रत्येकी अनुक्रमे 20 कोटी रुपये व 26 कोटी रु. अनुदान मंजूर केले होते. आता कोरोना परिस्थितीमुळे धारवाड जिल्हा प्रशासनाने तात्पुरते कोविड इस्पितळ निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत.