बेंगळूर /प्रतिनिधी
कर्नाटक राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना धारवाड आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात पूर्ण लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे १६ जुलैपासून दक्षिण कन्नड एका आठवड्यासाठी लॉकडाऊन असेल, तर धारवाड जिल्ह्यात १० दिवसांसाठी लॉकडाऊन असणार आहे. १५ जुलै रोजी सकाळी १० ते २ ४ जुलै रोजी रात्री ८ पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कलबुर्गी, शिवमोगा आणि रायचूर जिल्ह्यात देखील लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री येडियुरापा यांनी जिल्ह्यांतील उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी लॉक डाऊन संदर्भात अधिकाऱयांची मते जाणून घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्स नंतर जिल्हा प्रशासनाने लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढ होणाऱ्या म्हैसूर आणि इतर काही जिल्ह्यांनी निवडलेल्या भागात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोडगूमध्ये जिल्हा प्रशासनाने १५ ते ३१ जुलै दरम्यान संध्याकाळी ६ ते सकाळी ६ या वेळेत कर्फ्यू लागू केला आहे. कर्नाटकात एकूण पॉझिटिव्हची संख्या ४१ हजारावर पोहचली आहे. गेल्या २४ तासांत बंगळूरमध्ये ४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.