मार्गदर्शक तत्वे, मानक कार्यप्रणाली जिल्हाधिकाऱयांकडून जाहीर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
शासनाच्या आदेशानुसार जिल्हय़ातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी परवानगी देत कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कारवाईचे आदेशही दिले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे 7 ऑक्टोबरपासून खुली करण्यासाठी सोबतच्या कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक आणि प्रार्थना स्थळांच्या वेळेबाबत संबंधित विश्वस्त मंडळ, अधिकारी यांनी निर्णय घ्यायचा आहे. मास्क परिधान करणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, थर्मल स्क्रिनिंग करणे आणि वारंवार हात धुणे किंवा सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे.
सर्व संबंधित प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील धार्मिक स्थळे आणि प्रार्थना स्थळे यांच्याकडून कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार त्या-त्या क्षेत्रातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत.
यापूर्वी कोविड-19 व्यवस्थापनासाठी या कार्यालयाकडून विहित केलेले 12 ऑगस्ट 2021 रोजीचे आदेश आणि त्यात उल्लेख असलेल्या बाबी या सर्व निर्बंधासह पुढील आदेश होईपर्यंत तशाच लागू राहतील. आदेशाचे पालन न करणाऱया कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.