कॅम्प येथील घटनेने उडाली धावपळ
प्रतिनिधी/ बेळगाव
सॅन्ट्रो कार बेळगावकडून गणेशपूरकडे जात होती. यावेळी मिलिटरी हॉस्पिटल रस्त्यावरील शौर्य चौकाजवळ अचानक कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर अचानक कारने पेट घेतला. तातडीने यामधील कारचालक वाहनातून बाहेर पडला. यामुळे एकच धावपळ उडाली.
तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आणि कारवर पाण्याचा मारा केला. मात्र, तोपर्यंत कारचा समोरील भाग संपूर्ण जळून खाक झाला होता. सुदैवानेच या घटनेमध्ये कोणालाही इजा पोहोचली नाही.
कॅम्प परिसरात घडलेल्या घटनेमुळे मिलिटरी जवानही सतर्क झाले. त्यांनी तातडीने चालकाची चौकशी केली. या आगीमध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती पसरताच नागरिकांनी गर्दी केली. घटनेची नोंद कॅम्प पोलीस स्थानकात झाली असून इंजिनातील बिघाडामुळेच ही आग लागल्याचे सांगण्यात आले.