चित्रदुर्ग जिल्हय़ातील घटना : 27 जण गंभीर : मृत विजापूरचे
बेंगळूर/विजापूर
धावत्या खासगी बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेत तीन लहान मुलांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी चित्रदुर्ग जिल्हय़ाच्या हिरियुर ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली. निश्चिता (वय 3), स्पर्षा (वय 8), समृद्धी (वय 5), शिला (वय 33) व कविता (वय 23) अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण एकाच कुटुंबातील असून विजापूरच्या गणेशनगर येथील रहिवासी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, मंगळवारी मध्यरात्री विजापूरहून बेंगळूरकडे जाणाऱया कुक्के श्री ट्रव्हल्सच्या खासगी बसमधून 32 जण प्रवास करीत होते. पहाटे 3.30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग 4 वरील हिरियुर तालुक्यातील कस्तुरी रंगप्पनहळ्ळी येथे बसला अचानक आग लागली. आग लागल्यानंतरही बस तशीचा धावत होती. दरम्यान, जागे झालेल्या महिलांना बसला आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर चालकाला बसला आग लागल्याचे आढळून आले. मात्र चालक व वाहकाने बस रस्त्याकडेला थांबवून प्रवाशांचे संरक्षण न करता घटनास्थळावरून पळ काढला.
त्यानंतर काही प्रवाशी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. त्यानंतर याची माहिती हिरियुर पोलिसांना देण्यात आली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन अग्निशमन दलाला पाचारण केले. मात्र, तत्पूर्वी बस आगीत खाक झाली होती. या घटनेत विजापुरातील एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून 27 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चित्रदुर्ग आणि हिरियुर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद हिरियुर ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस चालक व वाहकाचा शोध घेत आहेत.