वृत्तसंस्था/ चंदिगड
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक धावपटू तसेच फ्लाईंग सिख म्हणून ओळखले जाणारे 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना गुरुवारी चंदिगडमधील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) पुन्हा दाखल करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डॉक्टरांनी घरी जाण्याचा सल्ला दिला होता.
मिल्खा सिंग यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने त्यांना लागलीच गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करीत आहे. मिल्खा सिंग यांची पत्नी 82 वर्षीन निर्मल कौर यांनाही कोरोनाची बाधा झाली होती आणि त्यांनाही मोहालीच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिल्खा सिंग आणि त्यांची पत्नी निर्मल कौर यांना कोरोनाची लागण झाली आहेच तसेच त्यांना आता न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती मिल्खा सिंग यांचे चिरंजीव गोल्फपटू जीव मिल्खा सिंग यांनी दिली आहे.