भाऊराव काकतकर महाविद्यालय रेडक्रॉस विंगतर्फे व्याख्यान
प्रतिनिधी / बेळगाव
द. म. शि. मंडळ संचालित भाऊराव काकतकर महाविद्यालयात रेडक्रॉस विंग आणि बेळगावच्या इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रीयांच्या आरोग्यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या सुप्रसिद्ध डॉ. उज्ज्वला हलगेकर, डॉ. अनिता उमदी आणि इंडियन रेडक्रॉसच्या खजिनदार विनोदिनी शर्मा उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. हलगेकर यांनी सकस व समतोल आहार-विहार आपले आरोग्य निरोगी ठेवण्यास कसे साहाय्य करते, हे विचार व्यक्त केले. तसेच रोजच्या धावपळीच्या जीवनात व्यायामावरही भर द्यावा, असे सांगितले. डॉ. अनिता उमदी यांनी मुलींच्या समस्या आणि त्यावरील उपाय या विषयावर विवेचन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुलींना मास्क व साबणाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. ए. एस. कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. डी. एन. मिसाळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. एस. व्ही. शिंदे यांनी करून दिली. सूत्रसंचालन वीणा पाटील यांनी केले. प्रा. नीता पाटील यांनी आभार मानले.