तालिबानप्रकरणी रशियाचे घुमजाव
चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्यास तयार आहेत. तर रशियाने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा केलेल्या तालिबानच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. अफगाणिस्तानातील रशियाचे राजदूत दिमित्रि झिरनोव्ह यांनी तालिबानच्या वर्तनाचे कौतुक करत त्यांच्या दृष्टीकोनाला सकारात्मक ठरविले आहे. तालिबानने काबूलला यापूर्वीच्या शासनाच्या काळाच्या तुलनेत अधिक सुरक्षित पेल्याचे झिरनोव्ह म्हणाले. पण भारत अद्याप लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या सरकारसोबतच उभा राहिला आहे. अशा स्थितीत रशियाची भूमिका भारताला झटका देणारीच आहे.
स्थिती शांततापूर्ण आणि चांगली अहे. तालिबानच्या अंतर्गत आता काबूलमधील स्थिती अशरफ गनी यांच्या तुलनेत अधिक चांगली असल्याचे झिरनोव्ह म्हणाले. अफगाणिस्तान सरकार पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आहे. अव्यवस्थेची भावना होती, सत्तेची पोकळी निर्माण होत रस्त्यांवर लुटारू उतरले होते असे राजदूताने म्हटले आहे. तर विदशमंत्री सर्गेई लावरोव्ह आणि अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी अफगाणिस्तानच्या स्थितीवरून चर्चा केली आहे.
अमेरिकेवर चीनकडून शरसंधान
अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतताच काबूल सरकारचे पतन झाले. तालिबानचे दहशतवादी कशाप्रकारे काबूलमधील अध्यक्ष भवनात दाखल झले आणि अमेरिकेला कशाप्रकारे स्वतःच्या राजनयिकांना हेलिकॉप्टरने बाहेर काढावे लागले हे जगाने पाहिले आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या विश्वासार्हतेला मोठा झटका बसल्याचे चीनने म्हटले आहे.
चीनने व्हिएतनाम आणि सीरिया युद्धाचे उदाहरण देत अमेरिका मदत करण्याऐवजी स्थिती बिघडल्यावर पळून जात असल्याचे म्हटले आहे. तालिबानच्या मोहिमेच्या धर्तीवर तैवानला चीनमध्ये सामील केले जाणार असल्याचे ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या श्वानाच्या मृत्यूवर शोक संदेश पाठविणाऱया तैवानच्या नेत्या आणि अध्यक्षा साई इन वेंग यांनी अफगाणिस्तानबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही. अफगाणिस्तानचे भूराजकीय महत्त्व तैवानपेक्षा कमी नाही. अफगाणिस्तानच्या भोवती अमेरिकेचे चीन, रशिया आणि इराण हे तीन मोठे प्रतिस्पर्धी आहेत. याचबरोबर अफगाणिस्तान हा अमेरिकाविरोधी विचारसरणीचा बालेकिल्ला आहे. तैवान बेटावर अमेरिकेच्या सैन्याची उपस्थिती नाही. अमेरिका वेळोवेळी समुद्रात युद्धनौका आणि लढाऊ विमाने पाठविण्याच्या व्यतिरिक्त तैवानसाठी काय करते? अमेरिकेला तैवानसाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. अमेरिका शस्त्रास्त्रs, पोर्क आणि बीफ विकून पैसे कमावित असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.
अमेरिकेची नाचक्की
अमेरिकेच्या प्रयोगाचा लाजिरवाणा अध्याय : न्यूयॉर्क टाइम्स
अफगाणिस्तानात अमेरिकेच्या प्रयोगाचा लाजिरवाणा अखेरचा अध्याय लिहिणारे अध्यक्ष म्हणून बायडेन यांच्याकडे इतिहासात पाहिले जाणार आहे. आधुनिक अध्यक्षीय इतिहासात बहुधाच एखाद्या अध्यक्षाचे शब्द तितक्याच वेगाने फिरले आहेत, जितक्या वेगाने बायडेन यांचे शब्द फिरले आहेत. 5 आठवडय़ांपूर्वीच अफगाणिस्तानात लोकांना अमेरिकेच्या दूतावासाच्या छतावरून एअरलिफ्ट केले जात असल्याचे तुम्ही पाहणार नसल्याचे बायडेन यांनी छातीठोकपणे म्हटले होते. पण रविवारीच अमेरिकेचे नागरिक आणि दूतावासातील कर्मचाऱयांना लँडिंग पॅडवरून लिफ्ट करावे लागल्याचे छायाचित्र समोर आल्याचे न्यूयॉर्क टाईम्सने नमूद केले आहे.
..तर अमेरिकेची जनता माफ करणार नाही : द गार्डियन
अफगाणिस्तानला जो बायडेन यांचा पराभव म्हणून पाहिले जाणार असल्याचे ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनने लिहिले आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याची माघार आणि तालिबानच्या कब्जानंतर अल-कायदाचा पुन्हा उदय झाल्यास अमेरिकेची जनता माफ करणार नाही. अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचे शेय आपल्याला मिळेल असे बायडेन यांना वाटले होते. पण हा निर्णय आता त्यांच्यावरच उलटला असल्याचे द गार्डियनने म्हटले आहे.
बायडेन यांचे विधान लाजिरवाणे : वॉल स्ट्रीट जर्नल
बायडेन यांची ही अफगाणिस्तानातील शरणागती आहे. जोपर्यंत अफगाण सैन्य स्वतःचा देश सांभाळत नाही तोवर अमेरिकेचे सैन्य तेथे असल्याने कुठलाच फरक पडणार नाही, भले मग एक वर्षे आणखी थांबले काय किंवा 5 वर्षे. अफगाणिस्तान याच पतनास पात्र आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतत असताना अध्यक्षांचे असे विधान इतिहासातील सर्वात लाजिरवाणे विधान असल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने नमूद केले आहे.
अमेरिकेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का : बीबीसी
बीबीसीने अफगाणिस्तानातून अमेरिकेत आलेल्या हादिया एसाजादा यांची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. दहशतवाद्यांनी हादिया यांच्या भावाची हत्या करत मृतदेह रस्त्यांवरून खेचत नेला आहे. अफगाणिस्तानच्या स्थितीवरून माजी सैन्याधिकारी बायडेन यांच्यावर टीका करत आहेत. बायडेन यांच्या निर्णयामुळे मानवी संकट उभे ठाकले असून यामुळे अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचे बीबीसीने नमूद केले आहे.
बायडेन यांच्यासाठी पॉलिटिकल डिजास्टर : सीएनएन
अफगाणिस्तानात अमेरिकेचा पराभव आणि तेथून सैन्याची माघारी बायडेन यांच्यासाठी पॉलिटिकल डिजास्टर (राजकीय आपत्ती) ठरणार आहे. या समस्यांनी ग्रस्त त्यांचे अध्यक्षत्व यापुढेही डळमळणार असून कार्यकाळावर शिंतोडे उडाले आहेत. बायडेन यांच्या या चुकांचा लाभ उचलण्यासाठी त्यांच्या विरोधकांमध्ये चढाओढ दिसून येणार असल्याचे सीएनएनने म्हटले आहे.
बायडेन यांच्या निर्णयामुळे अभूतपूर्व गोंधळ : पॉलिटिको
सैन्य माघारीचा निर्णय उलथापालथ आणि गोंधळाने भरलेला आहे. अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीचा निर्णय योग्यप्रकारे पार पाडला का हा प्रश्न इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिला जाणार असल्याचे पॉलिटिको या बेल्जियमच्या नियतकालिकाने म्हटले आहे.
एक प्रांत अद्याप तालिबानपासून मुक्त
अफगाणिस्तानवर 20 वर्षांनी पुन्हा तालिबानचा कब्जा झाला आहे. अध्यक्ष अरशफ गनी यांनी देश सोडला आहे. लोक देखील स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तेथून बाहेर पडू पाहत आहेत. पण अद्याप एक प्रांत असा आहे, ज्यावर तालिबानला कब्जा करता आलेला नाही. या प्रांताचे नाव ‘पंजशीर’ आहे. अफगाणिस्तानच्या 34 प्रांतांपैकी एक पंजशीर देशाच्या उत्तर-पूर्व भागात मोडतो. या प्रांतावर तालिबाचा कब्जा झालेला नाही, तसेच सोव्हियत युनियनला देखील यावर विजय मिळविता आला नव्हता.
पंजशीरने तालिबानसमोर शरणागती पत्करल्यास ती मोठी घटना ठरेल. तालिबान आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनेने मिळून 9/11 हल्ल्याच्या दोन दिवसांपूर्वी अहमद शाह मसूद यांना आत्मघाती हल्ल्यात ठार केले होते. अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हामिद करजाई यांनी अहमद शाह मसूद यांना राष्ट्रीय नायकाचा दर्जा दिला होता. मसूद यांना पंजशीरचा वाघ असेही म्हटले जाते. अहमद शाह मसूद आणि त्यांच्या सहकाऱयांनी मिळून तालिबानची जुलमी राजवट उलथवून टाकण्यास महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पंजशीरचे नेते आणि अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद यांनी तालिबानसमोर शरणागती पत्करण्यास नकार दिला आहे. पण तालिबानशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. अहमद मसूद आणि अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्लाह सालेह यांच्या एका बैठकीचे छायाचित्र समोर आले आहे. काबूलवर तालिबानच्या कब्जानंतर अमरुल्लाह सालेह यांना पंजशीरमध्येच पाहिले गेले होते. सालेह हे अहमद मसूद याच्यासोबत मिळून तालिबान विरोधात लढण्याची रणनीती आखत असल्याचे सांगण्यात येते.
अहमद मसूद यांचे वडिल अहमद शाह मसुद यांना अफगाणिस्तानातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जायचे. 80 च्या दशकात अहमद शाह मसूद यांनी सोव्हियत युनियनचा प्रतिकार केला होता. तालिबानला देखील पंजशीरवर कब्जा करता आला नव्हता. 9 सप्टेंबर 2001 रोजी अल-कायदा आणि तालिबानने मिळून अहमद शाह मसूद यांची हत्या घडवून आणली होती. अहमद मसूद देखील वडिलांचा कित्ता गिरवत असून तालिबान विरोधात संघर्ष करत आहेत. पंजशीरकडे अखेरचा आशेचा किरण म्हणून पाहिले जात आहे. अहमद यांनी लंडनच्या किंग्स कॉलेजमधून वॉर स्टडिजचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी तेथूनच आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.