प्रतिनिधी /पणजी
मानवी स्वातंत्र्याची ओढ प्रभावीपणे स्पष्ट करणारे कोकणी नाटक ’धुकोर’या शनिवारी, पाटो येथील ’संस्कृती भवन’च्या मल्टीपर्पज हॉलमध्ये सादर होणार आहे. आथोल फुगार्द या प्रख्यात दक्षिण आफ्रिकन नाटककाराचे ’अ प्लेस वीथ द पिग्स’ या मूळ इंग्रजी नाटकाचा, वसंत भगवंत सावंत यांनी केलेला हा कोकणी अनुवाद आहे. आथोल फुगार्द यांची ’रोड टू मक्का’, ’वॅली सॉन्ग’, ’आयलँड’ ही अन्य नाटके जगप्रसिद्ध आहेत.
’धुकोर’ हे नाटक मानवी स्वातंत्र्याचे निकष उलगडुन सांगते. दुसऱया महायुद्धादरम्यान, लढाईतून पळून येऊन एका डुक्करखान्यात आपल्या आयुष्याची दहा वर्षे लपून बसलेल्या एका रशियन सैनिकाच्या सत्यकथेवर हे नाटक आधारित आहे. अनेक वर्षे डुकरांबरोबर राहिल्यानंतर या सैनिकाला आता बाहेरच्या जगाची आस लागली लागली आहे पण डुकरांपासून मोकळे होणे आता तसे सोपे नसते. त्यासाठी त्याला फार तीव्र असा मानसिक संघर्ष करावा लागतो आणि ’स्वतंत्रता’ या उदात्त मानवी असोशीचे यथार्थ ज्ञान करून घ्यावे लागते. ’धुकोर’ हे नाटक या संघर्षाचे चित्रण करते
’अपरांत माची’ या संस्थेची ही निर्मिती असून, मयुर मयेकर आणि दीपलक्ष्मी मोघे हे कलाकार या नाटकात मुख्य भूमिका करत आहेत. ज्ञानेश मोघे यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे. या नाटकाचा कालावधी एक तास 45 मिनिटे आहे. शनिवार 9 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता सुरू होणारा हा नाटय़प्रयोग सर्वांसाठी खुला आहे.