पीडित महिलेचा निर्धार, विशाखा समिती करणार सोमवारी चौकशी :‘तरुण भारत’ त्या महिलेच्या पाठीशी,विविध संघटनांकडून कडक कारवाईची मागणी सुरुच
प्रतिनिधी /सातारा
गेल्या काही महिन्यांपासून गटशिक्षणाधिकारी त्या पीडित महिलेला त्रास देत आहे. सातत्याने घरी जावून शाळेवर जावून तिचा मानसिक छळ करुन तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली. अशा गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांस बडतर्फ केले जात नाही तोपर्यंत लढा लढणार आहे,. असे त्या पीडित महिलेने ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. दरम्यान, विशाखा समितीतर्फे सोमवारी चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तशा आशयाचे पत्र विस्तार अधिकाऱयांकरवी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ तसेच पीडित शिक्षिकेला देण्यात आले आहे. शुक्रवारी रिपाइंच्यावतीने सावित्रीमाई फुले यांचे पुस्तक विशाखा समितीच्या अध्यक्षा तथा गटविकास अधिकाऱयांना भेट देवून लवकरात लवकर अहवाल तयार करा अशी विनंती केली. याचबरोबर प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी कारवाईबाबत आयुक्तांकडे लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे सांगितले.
जिह्यातील एका शिक्षिकेच्या शाळेवर अचानकपणे भेटी देणे, तिच्या घरी जाणे, शाब्दिक टोमणे मारणे असे प्रकार करत हद्दच ओलांडली ती शरीरसुखाच्या मागणीपर्यंत गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ याची मजल गेली. त्यामुळे अन्यायाविरोधात न्याय मिळण्यासाठी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे तक्रार करताच व ‘तरुण भारत’ने आवाज उठवताच त्या गटशिक्षणाधिकाऱयाची पाचावर धारण बसली आहे. शुक्रवारी तो पंचायत समितीत त्याच्या केबीनमध्ये सकाळी येवून गेला होता. गटविकास अधिकारी तथा विशाखा समितीच्या अध्यक्षा सुवर्णा चव्हाण यांनी त्याच्याबाबत विचारपूस केली. तसेच प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी त्याच्यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने शिक्षण आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, रिपाइंसह विविध संघटनांनी निवेदन दिले.
त्या पीडित महिलेशी ‘तरुण भारत’ने संवाद साधत आधार दिला. ‘तरुण भारत’चा फोन गेल्यानंतर त्या महिला भगिनीला आधार वाटला. दरम्यान, त्यांनी ही लढाई शेवटपर्यंत लढणार आहे, मागे हटणार नाही. बडतर्फीची कारवाई होत नाही तोपर्यंत माझा लढा सुरु राहणार आहे. खूप त्रास दिला आहे मला, असे दुःख त्यांनी मांडले. ‘तरुण भारत’च्यावतीनेही त्यांना शेवटपर्यंत पाठीमागे राहू असा विश्वास व्यक्त केला.
विशाखा समिती करणार सोमवारी चौकशी
‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करताच विविध संघटनांनी मागणी करताच सातारा पंचायत समितीच्या विशाखा समितीच्या अध्यक्षा सुवर्णा चव्हाण यांनी सोमवारी विशाखा समिती चौकशी करणार असल्याचे पत्र विस्तारअधिकाऱयांकरवी गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ आणि पीडित महिला शिक्षिकेला दुपारी दिले आहे. त्यामुळे विशाखा समिती चौकशी सोमवारी चौकशी होणार आहे.
रिपाइंने पुस्तक भेट देवून विशाखा समितीच्या अध्यक्षांकडे केली मागणी
विशाखा समितीच्या अध्यक्षा सुवर्णा चव्हाण यांना रिपाइंचे सातारा तालुका अध्यक्ष रवींद्र बाबर, अश्विन बडेकर यांनी चौकशी अहवाल लवकर तयार करावा. सातारा जिह्यातील शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकाऱयाकडून शिक्षक महिलेच्या बाबतीत घडलेला प्रकार हा शिक्षण विभागाला व सातारा जिह्याच्या अस्मितेला काळिमा फासणारा प्रकार आहे. या घटनेचा जाहीर निषेध व संबंधित गटशिक्षणाधिकाऱयाची लवकरात लवकर चौकशी करून दोषी असल्यास कठोर कारवाई करण्यात यावी. सातारा जिल्हा हा सावित्रीबाई फुले यांचा वारसा लाभलेला जिल्हा आहे शिक्षण विभागात जर शिक्षक महिलेसोबत वरिष्ठ अधिकाऱयांकडून असले घृणास्पद व निंदनीय प्रकार घडत असतील तर या शिक्षक महिलांच्या सुरक्षेची हमी कोण घेणार?, या मागणीचे निवेदन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्राr शिक्षणावर आधारित पुस्तक गटविकास अधिकारी तथा विशाखा समिती अध्यक्षा सुवर्णा चव्हाण यांना देण्यात आले. संबंधितांवर योग्य ती कारवाई न झाल्यास रिपाइं (आठवले गट) सातारा तालुका युवक आघाडीच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
रिपाइंच्या शहराध्यक्ष जयवंत कांबळे, योगेश माने यांनी प्राथमिकच्या शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देवून कारवाई लवकरात लवकर करण्याची मागणी केली. त्यांनी आयुक्तांकडे अहवाल पाठवून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
बिनबुडाच्या आरोपाच्या आधारे बदनामी करु नये-संजय धुमाळ
माझ्याबाबत काही वाईट प्रवृत्तींनी आपल्याकडे चुकीची माहिती दिली आहे किंवा मिळणार असेल तर त्या अनुषंगाने कृपया आपण आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्धी देऊ नये. कोणाची माझ्यासोबत तक्रार असेल तर माझी चौकशी रितसर होईलच. माझी कृपया बिनबुडाच्या आरोपाच्या आधारे बदनामी करु नये ही विनंती. चौकशी झाल्यावर सत्य सर्वांसमोर येईलच, असा खुलासा सातारचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांनी हस्तलिखिताद्वारे केला आहे.